औरंगाबाद : मागील तीन दिवसांपासून गारखेडा परिसरातील ५० फूट उंच झाडावर मांजात अडकलेल्या कावळ्याला वाचविण्यासाठी पक्षीप्रेमींनी केलेल्या धडपडीला यश आले. उंच शिडीचा आधार घेऊन अर्धा तासाच्या प्रयत्नानंतर कावळ्याला सुखरूप काढले तेव्हा उपस्थितांनी जल्लोष केला.
गारखेडा येथील सूतगिरणी क्वॉर्टर परिसरात निलगिरीच्या झाडावर मागील ३ दिवसांपासून एक कावळा मांजामध्ये अडकला होता. ही बाब येथील पक्षीप्रेमी विशाल जाधव यांच्या लक्षात आली. त्यांनी लगेच पक्षी अभ्यासक डॉ. किशोर पाठक यांना माहिती दिली. त्यांनी सर्पमित्र मनोज गायकवाड यांना घटनास्थळी पाठविले. निलगिरीच्या झाडावर उंचावर मांजामध्ये कावळ्याचा पाय अडकला होता. तो अन्न-पाण्याविना लटकत होता. त्याखालून ११ के.व्ही.ची विद्युत तार लटकत होती.
पक्षीप्रेमी पवन जाधव यांनी त्यांच्याकडील हायड्रोलिक शिडी असलेली गाडी आणली. महावितरणचे वायरमन राजू रत्नपारखी आणि विशाल जाधव यांनी एक तासासाठी फिडर बंद केले. हायड्रोलिक शिडी ३० फूट उंच नेली. तरीही आणखी २० फूट अंतर बाकी होते. मग २० फुटांचा बांबू आणून त्यास वरील बाजूस कोयता लावण्यात आला. मनोज गायकवाड व पवन जाधव यांनी मांजा कापण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत खाली जमलेल्या लोकांनी मोठी सतरंजी धरली. मांजा कापला जाताच कावळा अलगद सतरंजीवर पडला.
एका पक्ष्याचा जीव वाचविल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता. मांजामुळे कावळ्याला जखम झाली होती. त्याला उपचारासाठी डॉ. किशोर पाठक यांच्या संस्थेत दाखल करण्यात आले. झाडावरून कावळ्याला काढण्यासाठी संजय लवटे, बाळू लहाने, विशाल घायाळ यांनीही मदत केली.