वाळूज महानगर : पत्नीच्या निधनानंतर पोटच्या मुलीवर चार वर्षांपासून नराधम पित्याने लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना बुधवारी (दि. ७) रात्री वडगाव कोल्हाटी परिसरात उघडकीस आली आहे. नात्याला काळीमा फासणाऱ्या नराधम पित्याविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन त्यास पोलिसांनी जेरबंद केले आहे.
या विषयी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संजय (४२ वर्षे) हा वाळूज एमआयडीसीतील एका कंपनीचा कामगार असून तो कुटुंबासह वडगाव कोल्हाटी परिसरात वास्तव्यास आहे. चार वर्षापुर्वी संजय याच्या पत्नीचे निधन झाल्यानंतर तो मुलगी रेखा (१५ वर्षे) व मुलगा प्रेम (१२ वर्षे) या दोघांसह एकटाच राहत होता. पत्नीच्या निधनानंतर महिनाभरातच वासनांध संजय याने पोटच्या अल्पवयीन मुलीसोबत लगट करण्यास सुरूवात केली. जन्मदात्या पित्याच्या या वागण्यामुळे घाबरलेल्या रेखाने विरोध केल्यानंतर संजय याने मारहाण करण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केला. यानंतर आरोपी संजय हा सतत रेखा हिला धमक्या देऊन तिच्यावर वेळोवेळी अत्याचार करीत होता.
आईचे निधन झाल्यामुळे तसेच घरात लहान भाऊ असल्यामुळे रेखा हा अत्याचार मुकपणे सहन करीत होती. अशातच पत्नीच्या निधनानंतर ६ महिन्याने संजय याने दुसरा विवाह केला. दुसरी पत्नी आल्यावर संजय हा पत्नीला मारझोड करुन तिला माहेरी पाठविल्यानंतर पुन्हा रेखा हिच्यावर अत्याचार करु लागला. वडील सावत्र आईलाही मारहाण करुन तिला घराबाहेर हाकलुन देत असल्यामुळे रेखा हिने सावत्र आईलाही वडीलांच्या अत्याचाराची माहिती दिली नाही. दरम्यानच्या कालावधीत रेखा ही महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांना आरोपी पिता तिच्या असहायतेचा फायदा घेऊन तिच्यावर पाशवी अत्याचार करीत होता.
अखेर चार वर्षांपासून सुरु असलेल्या अत्याचाराची माहिती रेखाने तिच्या लहान भावाला सांगितली. हे ऐकून प्रेमला धक्काच बसला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार केल्यास आपला सांभाळ कोण करेल, या भितीमुळे दोघा बहिण- भावानी या घटनेची कुठेही वाच्यता केली नाही.
यानंतर रेखाची मैत्रीण सुधा व प्रेम या दोघांनी रेखाला धीर देत पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा सल्ला दिला. जन्मदात्याच्या अत्याचारामुळे त्रस्त झालेल्या रेखाने सुधासोबत बुधवारी (दि.७) पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांची भेट घेऊन आपबिती कथन केली. या तक्रारीनंतर पोलीस पथकाने तात्काळ नराधम पिता संजय यास वाळूज एमआयडीसीतून ताब्यात घेऊन जेरबंद केले.