औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या १ मे रोजी झालेल्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावरील सभेदरम्यान नांदेड मनसेच्या पदाधिकाऱ्याची २० तोळ्याची सोनसाखळी चोरट्यांनी हिसकावली होती. ही साखळी सिटी चौक पोलिसांनी परत मिळवली असून, दोन चोरट्यांना अटक केल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक अशोक गिरी यांनी दिली.
दत्ता श्रीमंत जाधव आणि उमेश सत्यभान टल्ले (दोघेही रा. गांधीनगर झोपडपट्टी, पेठ बीड ता. जि. बीड) अशी अटकेतील चोरट्यांची नावे आहेत. दत्ताला पुण्यातून तर उमेशला बीडला पोलिसांनी उचलले. नांदेड येथील मनसेचे पदाधिकारी मॉन्टीसिंग जहागीरदार हे कार्यकर्त्यांसह वाहनाने सभेसाठी आले होते. रात्री आठच्या सुमारास राज ठाकरे यांचे आगमन झाले. त्यावेळी प्रवेशद्वारावर गर्दी होती. त्या गर्दीचा फायदा घेऊन गळ्यातील ही सोनसाखळी हिसकावण्यात आली. सिटी चौक पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजवरून सोनसाखळी हिसकावणारे हे बीड येथील असल्याचे आढळले. पो.नि. गिरी यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक अशोक भंडारे, उपनिरीक्षक कल्याण चाबूकस्वार, जमादार विलास काळे, देशराज मोरे, अभिजीत गायकवाड यांच्या पथकाने बीड येथे शोध घेतला. मात्र ते सापडले नाहीत. अधिक तपासाअंती दत्ता पुण्यात व उमेश बीडला सापडला. कसून चौकशी केली तेव्हा त्यांनी चोरीची कबुली देत सोनसाखळी काढून दिली.
चोरटे सराईत गुन्हेगारदत्ता जाधव व उमेश टल्ले हे दोघे आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर विविध प्रकारचे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यांनी सिटी चौक पोलिसांना अनेक वेळा हुलकावणी दिली होती. यावेळी पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या. या कामगिरीबद्दल सिटी चौक पोलिसांना बक्षीस देण्यासाठी वरिष्ठ अधिकारी शिफारस करणार असल्याचे समजते.