औरंगाबाद : अभासी चलन अर्थात ‘बिटकाईन’ हे नव्या युगाचे चलन असून आज ना उद्या भारताला देखील या अभासी चलनाला मान्यता द्यावी लागेल, असा दावा प्रख्यात अर्थतज्ज्ञ डॉ. विजय ककडे यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सहकारमहर्षी बाळासाहेब पवार अध्यासन केंद्राच्या वतीने डॉ. विजय ककडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. प्र.कुलगुरू डॉ. शाम शिरसाठ अध्यक्षस्थानी होते. या ऑनलाईन व्याख्यानास कुलपती नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य किशोर शितोळे, डॉ. राजेश करपे, उद्योजक मानसिंग पवार, कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी, केंद्राचे संचालक डॉ. पी. व्ही. देशमुख, डॉ. कैलास अंभुरे आदींची उपस्थिती होती. यावेळी डॉ. ककडे यांचे ‘एकविसाव्या शतकातील चलन बिटकॉईन’ या विषयावर व्याख्यान झाले.
ते म्हणाले, अलीकडच्या काळात आभासी चलन हे जागतिक चलन बनले आहे. गेल्या वर्षभरात ‘कोरोना’मुळे जगभर ऑनलाईन आर्थिक व्यवहाराचे प्रमाण वाढले आहे. जागतिकीकरणामुळे राष्ट्राराष्ट्रांतील भिंती संपुष्टात आल्या असनू एक अभासी जग निर्माण झाले आहे. या वैश्विक खेड्यात सर्वच क्षेत्रांत आंतरराष्ट्रीय व्यवहाराचे प्रमाण वाढले आहे. सध्या तरी आपल्या देशात ‘बिटकॉईन’ चलनाला सहा महिने मुदत दिली आहे. त्यानंतर सदर व्यवहार बंद होतील. असे असले तरी या चलनाला भविष्यात मान्यता द्यावीच लागेल.
प्र.कुलगुरु डॉ. शाम शिरसाठ यांनी अध्यक्षीय समारोप केला. डॉ. पुरुषोत्तम देशमुख यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. अजय पवार याने सूत्रसंचालन केले, तर संजय शिंदे यांनी आभार मानले.