वाळूज महानगर : वाळूजजवळील बजाज मटेरियल गेटसमोरील सिग्नलवर गुरुवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास पाच वाहने एकमेकांवर भिडली. सुदैवाने या अपघातात कुणीही जखमी झाले नसून, एका कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अहमदनगरकडून कार (एम.एच.१९, बी.जे.०५७२) ही औरंगाबादच्या दिशेने जात असताना सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास बजाज मटेरियल गेटसमोरील सिग्नलवर लाल दिवा लागल्याने थांबली. कार अचानक थांबल्याने पाठीमागून येणारी कार (एम.एच.२१, व्ही.४४९७) ही समोरील कारवर धडकली तर या कारच्या मागे असलेला ट्रक (के.ए.०१, एम.१२९९) हा कारवर जाऊन धडकला. या विचित्र अपघातात समोरील कार व पाठीमागील ट्रकमध्ये अडकलेल्या कारचे (एम.एच.२१, व्ही.४४९७) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
या घटनेनंतर तिन्ही वाहनचालकांत वाद झाला. त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच वाहतुक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी अपघातस्थळ गाठुन चालकांची समजुत काढत अपघातग्रस्त वाहने बाजुला काढण्याचा प्रयत्न केला. अपघातामुळे तीन वाहने रस्त्यावर उभी असताना पुढे जाण्याच्या प्रयत्नात ढम्परने (एम.एच.२१, एक्स ७६०७) समोर जाणाºया कारला (एम.एच.१५, ईपी ७६९९) धडक दिली. या विचित्र अपघातात सुदैवाने कुणीही जखमी झाले नसून एका कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या अपघातामुळे बजाज मटेरियल गेटसमोर वाहनाच्या लांबच-लांब रांगा लागल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती. वाहतुक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी अपघातग्रस्त वाहने बाजुला हटविल्यानंतर अर्ध्या तासाने या महामार्गावरील वाहतुक सुरळीत झाली. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नसल्याचे सांगण्यात आले.