भोकरदन (जि. जालना) : राजकारणात चढ-उतार सुरूच असतात. राजकारणात कोणीच कोणाचा कायम शत्रू आणि मित्र नसतो, अशी सांगत नाराज कार्यकर्त्यांचे मन वळविण्याचे प्रयत्न केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केल्याचे सूत्रांनी सांगितले.
आ.अब्दुल सत्तार यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासमोर नवीनच धर्मसंकट उभे ठाकले आहे. खुद्द सिल्लोडच्याच भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सत्तारांना प्रखर विरोध आणि दुसरीकडे सत्तारांना दिलेला शब्द, अशा पेचात दानवे अडकले आहेत. सिल्लोडच्या भाजप कार्यकर्त्यांनी भोकरदनला दानवे यांची भेट घेऊन आपल्या तीव्र भावना त्यांच्या कानी घातल्या. यापूर्वी सत्तार यांनी भाजप तसेच तुमच्या विरोधात राळ उठविली होती. ही बाब विसरून चालणार नाही, याचे स्मरण कार्यकर्त्यांनी दानवेंना करून दिले. तुमची इच्छाच असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी तुम्हाला सोबत घेऊन चर्चा करतो, असे आश्वासन दानवेंनी नाराजांना दिले.
भाजपचे शिष्टमंडळ भोकरदनलाआमदार सत्तार हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वाखाली अगदी लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर सत्तार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या गाठी-भेटी अलीकडेच घेतल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर सिल्लोड तालुक्यातील भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी सत्तार यांना भाजपमध्ये प्रवेश देऊ नये म्हणून सिल्लोड येथे मेळावा घेऊन विरोधही केला होता. त्यानंतर बुधवारी दुपारी १२ वाजेदरम्यान सिल्लोड येथील माजी आमदार सांडू लोखंडे, सुरेश बनकर, ज्ञानेश्वर मोठे, इद्रिस मुलतानी, अशोक गरूड, सुनील मिरकर, विनोद मंडलेचा, गजानन राऊत यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने भोकरदनला दानवे यांच्या निवासस्थानी जाऊन चर्चा केली.