औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी झालेल्या आढावा बैठकीला न बोलावल्याने भाजप आणि ‘एमआयएम’च्या लोकप्रतिनिधींमध्ये नाराजी आहे.
जिल्ह्यात आमदार हरिभाऊ बागडे, आ. अतुल सावे, आ. प्रशांत बंब हे भाजपकडून विधानसभा सदस्य आहेत, तर डॉ. भागवत कराड हे राज्यसभा सदस्य आहेत. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हे आहेत. यांपैकी कुणालाही मुख्यमंत्र्यांच्या बैठकीचे निमंत्रण नव्हते; तर दुसरीकडे पालकमंत्री सुभाष देसाई, रोहयो मंत्री संदिपान भूमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, आमदार अंबादास दानवे, आ. संजय शिरसाट, आ. उदयसिंह राजपूत, आ. रमेश बोरनारे, माजी खासदार चंद्रकांत खैरे या शिवसेनेच्या नेत्यांची उपस्थिती होती. याशिवाय विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, आदींची उपस्थिती होती.
यासंदर्भात एमआयएमचे खा. जलील म्हणाले की, लोकसभेचे अधिवेशन सुरू असल्यामुळे मी दिल्लीत आहे. परंतु मुख्यमंत्री जिल्ह्याच्या विकासाचा आढावा घेण्यासाठी येणार असल्याचे माहीत नव्हते. तसे निमंत्रणही नव्हते. तर भाजपचे आमदार अतुल सावे म्हणाले की, त्यांना त्यांच्या पक्षाचे लोकप्रतिनिधी चालते, परंतु भाजपकडून काही भीती असेल म्हणून त्यांनी बोलावले नाही.
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी याबाबत सांगितले की, ही बैठक फक्त अधिकाऱ्यांची होती. मुख्यमंत्र्यांच्या तशाच सूचना होत्या. कुणालाही निमंत्रित करण्याचा मुद्दाच नव्हता. मुख्यमंत्र्यांच्या पक्षाचे लोकप्रतिनिधी मनानेच आले, त्यांना आम्ही रोखू शकलो नाही. बैठकीत आलेले लोकप्रतिनिधी, राज्यमंत्री हे काहीही बोलले नाहीत. अधिकाऱ्यांनीच सादरीकरण केले.