छत्रपती संभाजीनगर : देशात निवडणुका सुरू झाल्यानंतर प्रथमच भारतीय जनता पक्ष औरंगाबादलोकसभा मतदारसंघातून प्रत्यक्ष लढणार, असे जवळजवळ निश्चित झाले आहे. गेल्या निवडणुकीपर्यंतचा युतीतील भाजपचा जिवलग मित्र व विद्यमान कट्टर विरोधक शिवसेना (उबाठा) यांच्यात ही लक्षवेधी झुंज होईल, असे दिसते.
शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी जिल्ह्यात जनसंवाद साधत लोकसभेचे रणशिंग फुंकले. त्यांच्या पाठोपाठ भाजपचे चाणक्य, देशाचे गृहमंत्री अमित शाह गुरुवारी शहरात जाहीर सभेला संबोधित करून भाजपच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. गेली २५ वर्षे युतीत सोबत राहून अनेक देदीप्यमान विजय मिळविणारे भाजप व शिवसेना आता कट्टर विरोधक म्हणून आमनेसामने येणार असून, जनता कोणाच्या बाजूने उभी राहते, तेही स्पष्ट होईल.
१७ निवडणुकांत सात खासदार काँग्रेसचेलोकसभेची व देशाची पहिली सार्वत्रिक निवडणूक १९५२ मध्ये झाली व अपेक्षेप्रमाणे काँग्रेसचे सुरेशचंद्र आर्य हे औरंगाबादचे पहिले खासदार झाले. त्यानंतर १९७७ पर्यंत सलग पाच वेळा काँग्रेस उमेदवाराने हा मतदारसंघ राखला. त्यात अनुक्रमे स्वामी रामानंद तीर्थ, बी. डी. देशमुख (दोन वेळेस) व माणिकदादा पालोदकर हे खासदार झाले. आणीबाणीनंतर १९७७ मध्ये जनता दलाचे बापू काळदाते हे विजयी झाले. त्यानंतर तीन वर्षांतच पुन्हा निवडणुका होऊन पुन्हा काँग्रेसचे काझी सलिम विजयी झाले. काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या शरद पवारांच्या एस काँग्रेसचे साहेबराव पाटील यांनी १९८५ मध्ये ही जागा काँग्रेसकडून हिसकावली. विशेष म्हणजे तेव्हा राजीव गांधी यांच्या नेतृत्वात देशभरात काँग्रेसने ४००हून अधिक जागा जिंकल्या होत्या.
युती झाली व काँग्रेस गारठली१९८५ नंतर शिवसेना व भाजपची युती झाली व काँग्रेस निवडणुकीत पराभूत होऊ लागली. नवव्या लोकसभेत प्रथमच युती पुरस्कृत अपक्ष उमेदवार मोरेश्वर सावे लोकसभेत पोहोचले. दहाव्या लोकसभेत शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून दुसऱ्यांदा सावे विजयी झाले. युतीने ११ व्या लोकसभेत प्रदीप जैस्वाल यांना पाठविले. १९९८ मध्ये काँग्रेसचे रामकृष्ण बाबा यांनी जैस्वालांचा पराभव केला. पुन्हा वर्षभरात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये प्रथमच चंद्रकांत खैरे लोकसभेत गेले. ते सतत चार वेळेस खासदार राहिले. २०१९ मध्ये त्यांना पराभवाचा धक्का बसला व एमआयएमचे इ्म्तियाज जलिल विजयी झाले.
जनसंघाने दोनदा आजमावले नशीबऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून जनसंघाने दोनदा नशीब आजमावले. परंतु, त्यांच्या पदरी अपयशच आले. लोकसभेच्या चौथ्या निवडणुकीत (१९६७) जनसंघाने बी. गंगाधर यांना उमेदवारी दिली. तेव्हा काँग्रेसचे उमेदवार होते भाऊसाव (बी.डी.) देशमुख. बी. गंगाधर यांना तिसऱ्या क्रमांकाची ३७८८३ मते मिळाली. देशमुख यांनी ५५.८२ टक्के (१,३५,८६५) मते घेत विजय संपादन केला, तर दुसऱ्या क्रमांकावर एस.जी. सरदेसाई (५२४०१) होते. लोकसभेची पाचवी निवडणूकही जनसंघाने लढविली होती. इंदिरा गांधी यांनी तेव्हा गरिबी हटावचा लोकप्रिय नारा दिला होता. या नाऱ्यावर काँग्रेसचे माणिकदादा पालोदकरांनी १ लाख ९४ हजार ९२६ मते घेत दणदणीत विजय प्राप्त केला. त्यांचे प्रतिस्पर्धी जनसंघाचे उमेदवार रामभाऊ एकनाथ गावंडे हे ४७ हजार १५ मते घेऊन दुसऱ्या क्रमांकावर होते.