- पुरूषोत्तम करवामाजलगाव ( बीड) : माजलगाव मतदार संघातील भाजपमधील गटबाजी एका मिनिटात संपून टाकू शकते परंतु महाराष्ट्रातील गटबाजीचं काय ? असे म्हणत पंकजा मुंडे यांनी पक्षाला घरचा आहेर दिला. यामुळे राज्य भाजपामध्ये सर्व काही सुरळीत नसल्याचे त्यांच्या बोलण्यावरून दिसू लागले.
माजीमंत्री पंकजा मुंडे या माजलगाव शहरात एका खाजगी कार्यक्रमाला आल्या होत्या. माजी सभापती नितीन नाईकनवरे यांच्या निवासस्थानी पंकजा मुंडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यापुढे पुढे बोलताना म्हणाल्या की , आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना निश्चितच बळ देण्यात येणार आहे. तसेच माजलगाव मतदार संघातील पक्षांतर्गत गटबाजी मी एकाच मिनिटात संपवू शकते, मी आक्रमण म्हटल्यास सर्व एक दिलाने काम करतील. पण राज्यामध्ये पक्षांतर्गत गटबाजी असताना बीड जिल्ह्याच्या स्थानिक गटबाजीवर काय भाष्य करू? असे म्हणत यापुढे सर्व एकदिलाने काम करताना दिसतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी माजी आ. आर. टी. देशमुख , माजलगाव मतदार संघाचे भाजप नेते रमेश आडसकर, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन मोहन जगताप, माजी सभापती नितीन नाईकनवरे यांची एकत्रित उपस्थिती यावेळी या ठिकाणी दिसून आली.पंकजा मुंडे यांच्या दौऱ्यानिमित्त एकत्र आलेल्या सर्व भाजपाचे दिग्गज नेते भविष्यात एकत्रित निवडणुकीत काम करतील का ? असा प्रश्न यावेळी कार्यकर्त्यांसमोर पडला. नाईकनोर यांच्या निवासस्थानाबरोबर रमेश आडसकर,मोहन जगताप यांच्या निवासस्थानी स्वतंत्र भेटी दिल्या.