औरंगाबाद : मूळचे शिवसेनेचे असलेले भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष किशनचंद तनवाणी शिवसेनेच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा औरंगाबादच्या राजकीय वर्तुळात शुक्रवारी दिवसभर रंगली. याविषयी भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी दुजोराही दिला. मात्र, तनवाणी यांना विचारले असता त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा प्रश्नच निर्माण होत नसल्याचे स्पष्ट केले.
किशनचंद तनवाणी हे इच्छुक असलेला औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघ युतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला जातो. युती झाल्यास तनवाणी यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे त्यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याची चर्चा शुक्रवारी (दि.३०) दिवसभर सुरू होती. भाजपचे पदाधिकारीही अधिकृत बोलण्यास तयार नव्हते. मात्र, प्रवेश करणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा देत होते. याविषयी तनवाणी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी मुंबईला समाजाच्या बैठकीसाठी आलो आहे. शिवसेनेत प्रवेश करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेतील औरंगाबादेत झालेली सभा मध्य विधानसभा मतदारसंघातच झाली आहे, त्यामुळे भाजप सोडण्याचा निर्णय कसा घेईल, असा प्रतिसवालही त्यांनी केला.