उस्मानाबाद : भाजपाला ग्रामीण भागात फारसा जनाधार नसून काँग्रेसची तळागळातील घटकांसोबत नाळ जोडलेली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळेल, असा दावा करणाऱ्या जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेतेमंडळीवर आता आत्मपरिक्षण करण्याची वेळ आली आहे. कारण पंचायत समितीचे ३६ मतदारसंघ असे आहेत की जेथे भाजपाच्या उमेदवारांनी काँग्रेसच्या उमेदवाराला मागे टाकून पुढे सरकले आहेत. भाजपाची ही मजल येणाऱ्या काळात काँग्रेससाठी आव्हान निर्माण करणारी ठरू शकते.केंद्र तसेच राज्यातील भाजपा सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले नाहीत, नोटबंदीमुळे सर्वाधिक फटका शेतकरी, शेतमजुरांना बसला, शेतीमालाला योग्य दर मिळत नाही अशा विविध मुद्यांचे दाखले देत काँग्रेस पक्षाने जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणुकीमध्ये काँग्रेस भक्कमपणे उभी राहील, असा दावा केला जात होता. एवढेच नाही तर याच मुद्यांभोवती काँग्रेसचा अख्खा प्रचार फिरला. काही मंडळीकडून भाजपाकडे ग्रामीण भागात फारसा जनाधारही नाही, असे सांगण्यात येत होते. परंतु, मागील दोन-अडीच वर्षात भाजपाकडून शहरांसोबतच ग्रामीण भागतही पाळेमुळे घट्ट करण्यावर भर दिला गेला. त्याचे परिणाम पालिका आणि नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतही दिसून आले. जिल्हाभरातील पंचायत समितीचे ३६ मतदार संघ असे आहेत की तेथे काँग्रेस उमेदवारांपेक्षाही जास्त मतदान भाजपाच्या उमेदवारांनी घेतले आहे. त्यामुळे भाजपाला ग्रामीण भागात जनाधार नाही, असा दावा करणाऱ्या काँग्रेस पुढाऱ्यांसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. विशेष म्हणजे, ३६ पैकी जवळपास १५ उमेदवार हे एकट्या उस्मानाबाद तालुक्यातील आहेत. यामध्ये कोंड, तेर, आळणी, कसबे तडवळे, वाघोली, सांजा, चिखली, पाडोळी, समुद्रवाणी, केशेगाव, करजखेडा, बेंबळी, रूईभर, वडगाव सि. आणि चिलवडी या गणांचा समावेश आहे.
ग्रामीण भागातही विस्तारतोय भाजप
By admin | Published: February 25, 2017 12:35 AM