औरंगाबाद : जनतेने मोठ्या अपेक्षेने सत्ता परिवर्तन केले; परंतु देशाच्या मानव विकासमंत्र्यांचे पदवीपर्यंत शिक्षण झालेले नसतानाही पदवीधर असल्याचे त्या सांगत असतील, तर त्यांच्या खरेपणावर लोकांनी काय विश्वास ठेवावा, असा हल्लाबोल करीत राज्याचे गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी केंद्रात सरकार स्थापन होऊन आठ दिवसही उलटत नाही तोच भाजपाच्या नैतिक भ्रष्टाचाराची पोलखोल सुरू झाल्याची टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आघाडीचे मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील उमेदवार सतीश चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर गोदावरी शाळेच्या प्रांगणात झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. पाटील म्हणाले की, शिक्षणमंत्र्यांच्या पाठोपाठ गोपीनाथ मुंडे यांच्या पदवीचा वादही उपस्थित झाला आहे. पदवी नसतानाही चांगले काम, चांगले नेतृत्व दिले जाऊ शकते; परंतु भ्रष्टाचाराचा बोलबाला करून सत्तेत आलेली ही मंडळी किती खरे बोलते हे त्यांच्या कृतीवरून दिसते. आपल्याला अभिमान वाटेल, असा उमेदवार निवडा, असे मराठवाड्यातील पदवीधरांना आवाहन करून ते म्हणाले की, काहींच्या नशिबी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील, तर काही मतदारांच्या नशिबी लोखंड घोटाळ्यातील उमेदवार आले; परंतु तुमच्या नशिबी चक्क कंडोम घोटाळ्यातील उमेदवार आला आहे. त्याला तुम्ही निवडलात आणि उद्या कोठे बाहेर गेलात तर काय सांगणार? लाट ओसरणार सतीश चव्हाण यांच्या विजयानंतर देशात आलेली लाट आपोआपच ओसरणार, असे सांगून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे म्हणाले की, १९९२ ते ९९ च्या प्राध्यापकांचा प्रश्न, उच्च महाविद्यालयाचा ‘कायम’ शब्द व औरंगाबादेत विधि विद्यापीठ सुरू करण्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल, अशी घोषणा त्यांनी केली. राज्यमंत्री फौजिया खान, आ. विक्रम काळे, आ. धनंजय मुंढे, आ. अमर राजूरकर, सतीश चव्हाण आदींची भाषणे झाली. डॉ. बाळासाहेब पवार यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी मंचावर राज्यमंत्री सुरेश धस, आ. निरंजन डावखरे, आ. अमर राजूरकर, आ. धनंजय मुंढे, आ. जयंत जाधव, आ. डॉ. कल्याण काळे, आ. सुभाष झांबड, आ. सुरेश जेथलिया, आ. एम. एम. शेख, आ. अब्दुल सत्तार, आ. संजय वाघचौरे, आ. विक्रम काळे, आ. चंद्रकांत दानवे, आ. राहुल मोटे, आ. पृथ्वीराज साठे, आ. बदामराव पंडित, कदीर मौलाना, नितीन पाटील, विलास औताडे, मुश्ताक अहमद, रेखा जैस्वाल, विनोद पाटील, अभिजित देशमुख, अफसर खान, नीलेश राऊत, उल्हास उढाण, विजय भांबळे, बाबा जानी, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रकाश सोळंके आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. शिक्षकांचे सर्वच प्रश्न मार्गी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा म्हणाले की, मी झपाट्याने सर्वच प्रश्न मार्गी लावल्यामुळे कोठेही जाऊन संवाद साधू शकतो. शिक्षणसेवकाचे नामाभिधान बदलले, त्यांच्या मानधनात दुप्पट वाढ केली, प्राथमिक व माध्यमिक शिक्षक, शाळांचे प्रश्न सोडविले,ज्युनिअर महाविद्यालयांचे कायम विनाअनुदानितमधील कायम हा शब्द काढला, वेतनेतर अनुदान दिले, अनेक प्रश्न सोडविले, काही सोडविण्याचे बाकी आहेत. २० जून नंतर तेही लवकरच सोडविले जातील, असे आश्वासन त्यांनी टाळ्याच्या कडकडाटात दिले. पद्माकर मुळेंची उपस्थिती मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लहाने मामा व उद्योजक पद्माकर मुळे यांची मंचावरील उपस्थिती लक्षणीय होती.
आठ दिवसांतच भाजपा सरकारची पोलखोल सुरू
By admin | Published: June 01, 2014 12:42 AM