उस्मानाबाद : शिवसेना-भाजपाची २५ वर्षाची युती तुटल्यानंतर सर्वच निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्धार शिवसेनेने केला आहे़ त्यानुसार होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकाही शिवसेना स्वबळावर लढणार आहे़ असे असले तरी भाजपाने मात्र, रासप, रिपाइं व स्वाभिमानी शेतकरी संघटनेसोबत महायुती कायम ठेवून निवडणुका लढण्याचा निर्धार केला आहे़ असे असले तरी दोन्ही पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या याद्या अद्यापही गुलदस्त्यात असून, बंडखोरी टाळण्यासाठी काहींना ‘कामाला लागा’ असे आदेश देण्यात आले आहेत़आजवरच्या जिल्ह्यातील बहुतांश निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजपाची युती झाली आहे़ मागील काही वर्षात शिवसेनेने काँग्रेसलाही सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकीय खच्चीकरण करण्याची एकही संधी सोडलेली नाही़ पंचायत समिती, जिल्हा परिषद, जिल्हा बँक असो अथवा बाजार समित्यांच्या निवडणुका असोत काँग्रेस-शिवसेना व भाजपाची बहुतांशवेळा आघाडी झाल्याचा इतिहास आहे़ मागील जिल्हा परिषद निवडणुकीतील पक्षीय बलाबल पाहता भाजपाचे केवळ दोन उमेदवार विजयी झाले होते़ तर शिवसेनेच्या १५ उमेदवारांनी जिल्हा परिषदेत प्रवेश मिळविला होता़ काँग्रेसला सोबत घेऊन शिवसेनेने जिल्हा परिषदेत सत्ता काबीज केली होती़ सत्तेत भाजपाला मात्र, सभापती पदापासूनही दूर रहावे लागले़ नगर पालिकेच्या निवडणुकीतही शहरासह जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी चौरंगी लढती झाल्या़ प्रमुख पक्षांनी स्वबळ आजमावल्याने अनेक ठिकाणी सत्तांतर झाल्याचे चित्र होते़ याचे राजकीय परिणाम जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतरही दिसून आले़ प्रारंभीपासूनच प्रमुख पक्षांकडून विशेषत: युतीतील दोन्ही पक्षांकडून स्वबळाची तयारी केली जात होती़ त्यातच २५ वर्षाची युती तुटल्याची घोषणा झाल्याने दोन्ही प्रमुख पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे़ शिवसेनेने स्वबळाचा नारा देत जोरदार फिल्डींग लावली आहे़ तर दुसरीकडे भाजपाने महायुतीतील रासप, रिपाइं व स्वाभिमानी शेतकरी संघटनेला बरोबर घेऊन निवडणुका लढविण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे़ त्यादृष्टीने चारही पक्षातील पदाधिकाऱ्यांची जागा वाटपावरून बोलणी झालेली आहेत़ असे असले तरी कोणाला किती जागा मिळणार ? हे मात्र, अद्यापही जाहीर करण्यात आलेले नाही़ सेना- भाजपाकडून इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या असून, भाजपा प्लस महायुतीकडे इच्छुकांची गर्दी आहे़ तर अशीच अवस्था शिवसेनेकडेही आहे़ दोन्ही पक्षांनी ठिकठिकाणी कार्यकर्त्यांचे मेळावे घेऊन पक्षाच्या विजयासाठी काम करण्याचे आवाहन केले आहे़ उमेदवारी अर्ज भरण्याची अंतीम मुदत १ फेब्रुवारी आहे़ असे असले तरी शिवसेना व भाजपाकडूनही पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची यादी घोषित करण्यात आलेली नाही़ केवळ बंडखोरी टाळण्यासाठी ३१ जानेवारी रोजी किंवा थेट १ फेब्रुवारीरोजीच अधिकृत एबीफॉर्म उमेदवारांना देण्यात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे़ (प्रतिनिधी)
भाजपाने बांधली घटकपक्षांची मोट
By admin | Published: January 29, 2017 11:46 PM