औरंगाबाद : पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याची टिंगल, फाजील आत्मविश्वास, फोडाफोडीचे राजकारण आणि शत्रू निर्माण करणारा नेता अशी देवेंद्र फडणवीस यांची झालेली प्रतिमा यामुळे भाजपला माघार घ्यावी लागण्याची शक्यता आहे. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांनी संधीचा फायदा घेत भाजपचे गर्वहरण करून पत्ते खेळायला सुरुवात केली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत भाजप फडणवीसांना डावलून स्वत:चा बचाव करण्याची दाट शक्यता असल्याचा सूर सजग महिला संघर्ष समितीतर्फे गुरुवारी आयोजित केलेल्या चर्चासत्रात उमटला.
राज्यातील राजकीय स्थितीच्या पार्श्वभूमीवर स्वामी रामानंद तीर्थ संशोधन केंद्र येथे ‘महाराष्ट्रातील राजकीय गोंधळ’ या विषयावर चर्चा करण्यात आली. यामध्ये सेवानिवृत्त न्यायाधीश प्रकाश परांजपे आणि प्रा. जयदेव डोळे यांनी सत्तेच्या खेळातील समीकरणे कशी जुळू शकतात, याविषयी माहिती दिली. परांजपे म्हणाले की, ९ नोव्हेंबरपर्यंत या चर्चेला पूर्णविराम मिळू शकतो अथवा कायद्याच्या चौकटीतून राज्यपाल राष्ट्रपती लागवट लागू करण्याविषयी हालचाल करू शकतात. कदाचित पुन्हा निवडणुका होण्याकडेही वाटचाल होऊ शकते किंवा भाजप नवा चेहरा समोर आणून बचावात्मक पवित्रा घेऊ शकतो.
प्रा. डोळे म्हणाले की, फडणवीस विरुद्ध बाकीचे सर्व असा वाद निर्माण झाला असून, फडणवीस पूर्णपणे एकाकी पडले आहेत. मोदींची जादू संपल्याचे हरयाणा आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीत दिसून आले असून, हे शरद पवार आणि सोनिया गांधी यांनी जाणले आहे आणि भाजपची नामुष्की करण्यासाठी त्यांची खेळी सुरू आहे.
मंगल खिंवसरा यांनी प्रास्ताविक केले. ताराबाई लड्डा, डॉ. स्मिता अवचार, डॉ. रश्मी बोरीकर, पद्मा तापडिया, किरण शर्मा, सुनिती धारवाडकर, भारती भांडेकर यांच्यासह ‘सजग’च्या सदस्यांची उपस्थिती होती.