औरंगाबाद : मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या सोमवारी झालेल्या सभेला अपेक्षित गर्दी का जमविता आली नाही? नियोजनात कुठे कमतरता राहिली का? याची दखल प्रदेश पातळीवरून घेण्यात येणार असल्याचे समजते.
सत्ता नसताना भाजपने गेल्या वर्षी शक्तिप्रदर्शनाने गाजविले. परंतु, आता केंद्रात आणि राज्यात सत्ता असतानाही सभेचे नियोजन कोलमडल्याची कारणमीमांसा प्रदेश पातळीवर होण्याची चर्चा आहे. गेल्या वर्षी भाजपने तीन कार्यक्रम घेतले. त्यात मार्चमध्ये झालेला ‘पीएनजी पाइपलाइन’च्या भूमिपूजनाचा कार्यक्रम सत्ता नसताना गर्दी जमवून साजरा केला. त्यावेळी तर फक्त केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचेच नेतृत्व होते.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत एप्रिल २०२२ मध्ये झालेल्या रस्ते लोकार्पणालादेखील बऱ्यापैकी गर्दी जमली होती. त्यानंतर जलआक्रोश मोर्चाचा इव्हेंटही भाजपने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात जोरदारपणे केला. या तिन्ही कार्यक्रमांत भाजपने सत्ता नसताना जाेरदार शक्तिप्रदर्शन केले. परंतु, राज्यात सत्ता असताना राष्ट्रीय अध्यक्षांच्या सभेचे नियोजन कोलमडले. त्याची वरिष्ठ पातळीवर दखल घेण्यात येणार असल्याचे समजते. ही सभा फक्त औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी होती. त्यामुळे सहा विधानसभा मतदारसंघांत तयारीसाठी फक्त पाच दिवसांचा कालावधी होता. शहर व ग्रामीण अशी नियोजनाची जबाबदारी होती.
जिंकण्याची तयारी ठेवा; उमेदवार नंतर ठरवूभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सोमवारी रात्री उशिरापर्यंत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभेच्या कोअर समितीची आयएमए हॉल येथे बैठक घेतली व लढायची व जिंकण्याची तयारी ठेवा, उमेदवार नंतर ठरविण्यात येईल, असे सांगून उमेदवारीचा सस्पेन्स वाढविला. शिवाय सहा विधानसभा मतदारसंघांतील आढावा घेत तेथील सद्य:स्थितीचेदेखील मूल्यांकन केले. लोकसभा जिंकायची आहे, त्या दिशेने तयारी करा, असेही त्यांनी सांगितले.
भाजपचा दावा असा...सभेचे नियोजन उत्तम केले होते. परंतु, निर्धारित वेळेपेक्षा सभेला जास्त उशीर झाला. त्यातच सभेला आलेल्या महिलांना घरी जायचे होते. शिवाय अनेक भागांना रात्री आठ वाजता पाणीपुरवठा करण्यात आला. त्यामुळे आम्ही स्वत: काही वाहनांतून महिलांना घराकडे नेण्याची व्यवस्था केली. सभेत कुठेही कमतरता नव्हती. सभेसाठी सर्वांना सोबत घेऊन नियोजन केले होते.- शिरीष बोराळकर, शहर जिल्हाध्यक्ष, भाजप