औरंगाबाद : बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांच्या शिक्षण संस्थेला महाविद्यालय सुरू करण्याची परवानगी देणाऱ्या इरादापत्रास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले असून न्या. एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्या. एम. जी. सेवलीकर यांनी या इरादापत्राच्या अंमलबजावणीस ९ जुलैपर्यंत अंतरिम स्थगिती दिली आहे.
जालना जिल्ह्यातील बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांच्या कै. तिलोकचंद कुचे शिक्षण प्रसारक मंडळास शासनाने अंबड तालुक्यातील किनगाव चौफुली येथे लोकनेते गोपीनाथराव मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सुरू करण्यासाठी इरादापत्र दिले होते. परंतु, परवानगी न मिळालेल्या अंबड तालुक्यातील रोहिलागड येथील संजनू शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव संजय अशोक जाधव यांनी त्यास अॅड. संदीप राजेभोसले यांच्यामार्फत खंडपीठात आव्हान दिले आहे.