औरंगाबाद : भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस ( Suresh Dhas) यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा ( BJP MLC Suresh Dhas's Rs 1,000 crore scam) केल्याचा सनसनाटी आरोप आज ॲड. असीम सरोदे ( Asim Sarode ) यांनी पत्रकार परिषदेतून केला. याप्रकरणी आरटीआय कार्यकर्ते राम खाडे आणि अब्दुल गनी यांनी तक्रार दाखल केली असून निष्पक्षपणे चौकशीकरून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ॲड. सरोदे यांनी यावेळी केली.
इनामी जमिनी भोगवटा वर्ग -२ च्या आष्टी येथील जमिनी हडपण्यामागे भ्रष्टाचाराची मोठी साखळी असल्याचा आरोप ॲड. असीम सरोदे यांनी यावेळी केला. माजी मंत्री आणि भाजपचे विधानपरिषदेचे आमदार सुरेश धस यांच्यावर १ हजार कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे खळबळ उडाली आहे. ॲड. असीम सरोदे यांनी सांगितले, सेवा कार्यासाठीच्या वक्फ, मंदिर ट्रस्ट यांच्या इनामी जमिनीवर सुरुवातीला दुसऱ्यांची नावे चढवायची. त्यानंतर आपल्या इच्छित लोकांना त्या जमिनी विकत घेयला लावायच्या. ज्यांची पात्रता नाही त्यांनी अशांनी जमिनी विकत घेतल्या आहेत. यासाठी आमदार धस यांच्या ताब्यातील मच्छिंद्र मल्टीस्टेट सोसायटीकडून करोडो रुपये देण्यात आले. या जमिनी बळकावण्यासाठी चुकीची व खोटी कागदपत्रे पुरवून खोटे रेकॉर्ड तयार करण्यात आली. त्यानंतर या जमिनी आ. धस यांच्या ताब्यात येत, अशा प्रकारे एक मोठी भ्रष्टाचाराची साखळी काम करत असे. या १ हजार कोटींच्या भ्रष्टाचारात भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस, त्यांचे कुटुंबीय आणि कार्यकर्ते यांचा समावेश आहे.
'ईडी'कडे सुद्धा तक्रार करणारयाप्रकरणी राम खाडे आणि अब्दुल गनी यांनी बीड आणि औरंगाबाद येथील लाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे माहिती आणि पुराव्यासह तक्रार करण्यात आली आहे. तसेच यात मोठ्याप्रमाणात पैश्यांचा गैरव्यवहार झालेला असल्याने याची वेगळी तक्रार ईडीकडे सुद्धा करण्यात येणार असल्याची माहिती ॲड. सरोदे यांनी दिली.