श्यामकुमार पुरे, सिल्लोड भाजपाचे बंडखोर अन् सेनेचे उमेदवार सुनील मिरकर यांनी तिसऱ्या क्रमांकाची मते घेतल्यामुळे भाजपाच्या मतांचे मोठ्या प्रमाणात विभाजन झाले. यात काँग्रेसचे अब्दुल सत्तार यांनी विकासावर जास्त जोर दिल्याने मतदारांनी त्यांच्या पारड्यात दुसऱ्यांदा सत्ता टाकली आहे. जवळपास १४ हजार मतांनी सत्तार विजयी झाले असले तरी सेनेने घेतलेली १५ हजार ९०९ मतेच भाजपासाठी कर्दनकाळ ठरल्याचे बोलले जात आहे.पाचही प्रमुख पक्षांचे उमेदवार रिंगणात असले तरी येथे काँग्रेस, भाजपात लढाई झाली. मोदी लाटेत सर्व चॅनल्सवर सत्तार यांचा पराभव होणार, असे वृत्त झळकत असल्याने सिल्लोडच्या मतमोजणीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून होते. सत्तार यांची उमेदवारी आधीच निश्चित होती. आघाडी सरकारमध्ये त्यांना अगदी शेवटचे काही महिने पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्रिपदही मिळाले होते. या माध्यमातून त्यांनी मतदारसंघात संपर्क वाढविला होता. विकासकामांचा त्यांनी मोठा बोलबाला केला होता. मतदारसंघात असलेले मुस्लिम मतदार हे ५५ हजार असले तरी त्यांच्या जीवावर निवडणूक जिंकता येणार नाही, हे त्यांनी आधीच हेरले होते. त्यामुळे सर्वसामान्यांना सत्तार यांनी आपल्या सत्तेचा वाटा देण्याचा प्रयत्न केला. जाती-पातीचे राजकारण हाणून पाडण्यात ते यशस्वी झाले. याउलट भाजपाचे सुरेश बनकर यांना प्रचारासाठी अगदी कमी कालावधी मिळाला. जवळचे मित्र असलेले सुनील मिरकर यांनी भाजपाला रामराम करून सेनेचे तिकीट मिळवले व भाजपाच्या मतांचे मोठ्या प्रमाणात विभाजन केले. त्यांच्या बंडखोरीमुळे बरेच मतदार संभ्रमात होते. १३ हजार ९२१ मतांच्या फरकाने सत्तार विजयी झाले अन् सेनेच्या मिरकर यांनी १५ हजार ९०९ मते मिळवली. नेमका हाच आकडा भाजपाच्या पराभवाला कारणीभूत ठरल्याची चर्चा लगेचच मतदारसंघात सुरू झाली. सत्तार यांच्या नियोजनापुढे बनकर टिकाव धरू शकले नाहीत. ४‘नवरा मेला तरी चालेल पण सवत रंडकी झाली पाहिजे’ या म्हणीचा प्रत्यय भाजपाच्या गोटात दिसून आला. उमेदवारीसाठी भाजपात बाशिंग बांधून असलेली मंडळी आतून बनकर यांच्या विरोधात प्रचारात होती. पण याचा बोभाटा होता. बनकर यांच्या एवढ्या मोठ्या पराभवामागे हे कारण आहे. बनकर यांचा पराभव झाला की पुढच्या निवडणुकीसाठी आपला मार्ग मोकळा होईल, अशी ही असंतुष्टांची खेळी होती.
भाजपाला नडला घरभेदीपणा
By admin | Published: October 21, 2014 12:51 AM