लोकमत न्यूज नेटवर्कपरळी : तालुक्यातील ७४ ग्रामपंचायतीचा निकाल सोमवारी तहसील कार्यालयात घोषीत झाला. तहसीलदार शरद झाडगे, गटविकास अधिकारी संजय केंद्रे यांच्या उपस्थितीत निकाल जाहिर करणे सुरू होते. ७४ पैकी ४१ ग्रामपंचायतीचे सरपंच पद राष्ट्रवादीकडे आले असल्याचा दावा पक्षाच्यावतीने करण्यात आला. तर पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली अनेक ग्रामपंचायतीवर वर्चस्व निर्माण झाल्याचा दावा भाजपने केला आहे.परळी तालुक्यातील अत्यंत प्रतिष्ठेची बनलेली धर्मापुरी ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष अॅड. गोविंद फड यांच्या पॅनलला दणदणीत यश प्राप्त झाले. रा.कॉ.च्या अश्विनी गोविंद फड या सरपंच पदाच्या उमेदवार होत्या. त्यांनी प्रतिस्पर्धी भाजपच्या उमेदवाराचा दारून पराभव केला. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रा.टी.पी.मुंडे यांच्या पत्नी शिवशालाबाई या मांडेखलेमध्ये विजयी झाल्या. कन्हेरवाडीत रा.स.प.युवक प्रदेश अध्यक्ष राजेभाऊ फड हे विजयी झाले आहेत. रा.कॉं.चे माजी तालुकाध्यक्ष माणिक फड यांचा रासप, भाजप प्रणित पॅनलने पराभव केला. पांगरी ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत रा.कॉं.च्या अक्षदा सुशिल कराड या विजयी झाल्या आहेत. या ठिकाणी मंदाकिनी मोहन मुंडे व जयश्री तिडके यांना पराभवाला सामोरे जावे लागले.तहसील कार्यालयात अंबाजोगाई उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल आनंद, संभाजीनगर स्टेशनचे निरीक्षक उमाशंकर कस्तुरे, परळी शहरचे निरीक्षक हेमंत मानकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
परळीत भाजप-राकाँची ‘श्रेयवादी’ लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2017 11:38 PM