छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्याच्या राजकारणातील व लोकसभा निवडणुकीत चर्चेची कांडी फिरवणारे नाव म्हणजे वेरूळच्या जनार्दन स्वामी मठाचे मठाधिपती महामंडलेश्वर शांतीगिरी मौनगिरी महाराज. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी माजी खा. चंद्रकांत खैरे यांना जेरीस आणले होते. २०१४ च्या निवडणुकीत ते अलिप्त राहिले. तर, २०१९ साली त्यांनी निवडणुकीत जोरदार रंग भरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांनी ऐनवेळी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला. आता भाजपने येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराजांच्या मठातच ग्रामविकास प्रशिक्षण कार्यक्रमाचा बेत आखला आहे. शनिवार ६ जानेवारी रोजी सकाळी १० वा. होणाऱ्या त्या कार्यशाळेत ५ हजारांहून अधिक विविध कर्मचारी आणि सरपंचांचा सहभाग असणार आहे.
जिल्ह्यात बाबाजी परिवार मोठ्या प्रमाणात आहे. २००९ साली शांतीगिरी यांनी १ लाख ४८ हजार २६ मते घेतली होती. कन्नड, गंगापूर, वैजापूर तालुक्यात त्यांचा मोठा भक्त परिवार आहे. विचाराधारा जुळवून भाजपने त्या परिवाराशी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जवळीक साधण्याचा प्रयत्न कार्यशाळेतून केल्याची चर्चा आहे. भाजपशी हातमिळवणी म्हणून नव्हे तर विचाराधारा एक असल्यामुळे शांतीगिरी महाराजांच्या आश्रम परिसरातील संत जनार्दन महाराज सभागृह कार्यशाळेसाठी उपलब्ध करून दिले आहे. या कार्यक्रमाला महाराज हजर राहणार नाहीत. असे महाराजांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या संकल्पनेतून ही कार्यशाळा होत आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन होणार आहे. यासंदर्भात बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात ग्रामविकास प्रशिक्षण कार्यशाळेच्या नियोजनासाठी ग्रामसेवकांची बैठक झाली. गावचे सरपंच तसेच पदाधिकाऱ्यांना या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी निमंत्रित करून कार्यशाळा यशस्वी करावी. गावाचा विकास करण्यात योगदान द्यावे, असे आवाहन बैठकीत करण्यात आले. अति. मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिरसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन तुपे, एल.जी. गायकवाड, जिल्हाप्रमुख संजय खंबायते, जिल्ह्यातील ग्रामसेवक बैठकीला उपस्थित होते.
सरपंच, ग्रामसेवकांचा सहभागवेरूळ येथे संत जनार्दन महाराज सभागृहात कार्यशाळा होणार आहे. आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांच्यासह सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, आशा सेविका, रोजगार सेवक तसेच ग्रामपंचायत स्तरावरील कर्मचारी, पदाधिकारी यात सहभागी होतील.-डॉ. विकास मीना, जि.प. सीईओ
राज्यातला हा पहिला प्रयत्नया कार्यशाळेच्या माध्यमातून गावाच्या विकासाची रूपरेषा समजावली जाईल. केंद्र आणि राज्याच्या योजना सामान्यांपर्यंत पोहोचवून ग्रामस्थांच्या जीवनात बदल आणण्याचा हा प्रयत्न आहे. विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी सगळ्यांच्या प्रयत्नांची जोड याद्वारे दिली जाणार आहे. राज्यातला हा पहिला प्रयत्न आहे.- डॉ. भागवत कराड, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री