औरंगाबाद : मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा शहरात दाखल झाल्यानंतर चिकलठाणा येथे स्वागत करण्यात आले. यानंतर फुलंब्री, पूर्व, पश्चिम आणि मध्य, अशा चार विधानसभा मतदारसंघांत यात्रेचा रोड शो करण्यात आला.
मुकुंदवाडी, एपीआय कॉर्नर, सिडको, सेव्हन हिल उड्डाणपूल, आकाशवाणी चौक, क्रांतीचौक येथे यात्रेचे फटाके फोडून स्वागत करण्यात आले. क्रांतीचौक येथे यात्रा पोहोचल्यानंतर तेथून पैठणगेट, गुलमंडी, महात्मा फुले पुतळापर्यंत रोड शो करण्यात आला. यावेळी इमारतींवरून यात्रेवर पुष्पवृष्टीही करण्यात आली. खडकेश्वर मंदिरापासून यात्रा मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर पोहोचली. गुलमंडीवर सर्वाधिक शक्तिप्रदर्शन करण्यात आले. गुलमंडी भाग शिवसेनेचा गड मानला जातो. याठिकाणी शक्तिप्रदर्शन करीत महासभाही मध्य विधानसभा मतदारसंघात घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
पाणीपुरवठ्यासाठी १,६०० कोटी देणारशहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न रखडला आहे. महापालिकेने १,६०० कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला आहे. या प्रस्तावाला राज्य सरकार मान्यता देणार आहे. यातून पाणीपुरवठा प्रश्न कायमस्वरूपी सोडवू .शहरातील रस्त्यांसाठी १०० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्यानंतरही शहरातील काही पदाधिकारी माझ्याकडे आले आणि निधी मागू लागले तेव्हा त्यांना सांगितले. आधी दिलेल्या निधीतील ७५ टक्के पैसे खर्च केल्याचे दाखवा, आणखी २०० कोटी रुपयांचा निधी देतो. रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी पैसे कमी पडू देणार नसल्याचेही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.