औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या मैदानात पक्षाने सांगितल्यावरून उमेदवारी अर्ज दाखल करणारे प्रवीण घुगे यांचा अर्ज शुक्रवारी छाननीत बाद झाला. त्यांनी अर्ज दाखल करताना शपथच घेतली नाही. त्यामुळे त्यांचा अर्ज बाद झाल्याचे सहायक निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.
घुगे यांच्यासह आठ जणांचे अर्ज बाद झाले. दाखल करण्यासाठी १२ नोव्हेंबर ही शेवटची तारीख होती. दुपारी ३ वाजेपर्यंतच्या वेळेत शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची गर्दी झाली. ४० उमेदवारांनी शेवटच्या दिवशी अर्ज दाखल केले. एकूण ५३ उमेदवारांचे ८३ अर्ज आल्याची नोंद झाली. त्या अर्जांची छाननी शुक्रवारी करण्यात आली. त्यात ८ जणांचे अर्ज बाद ठरले. बाद झालेल्या अर्जांमध्ये पूर्ण माहिती नसणे, शपथ न घेणे, कागदपत्रांची पूर्तता नसल्यामुळे ते बाद करण्यात आले.
शुक्रवारी एकूण ५३ उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली. त्यातील ४५ अर्ज वैध ठरले असून, ८ अर्ज अवैध ठरविण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्तांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे. १७ नोव्हेंबर ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. त्यानंतर किती उमेदवार मैदानात राहणार याचे चित्र स्पष्ट होईल. अवैध ठरलेल्या उमेदवारांत अतुल कांबळे, छाया सोनवणे, सुनील महाकुंडे, प्रवीण घुगे, प्रदीप चव्हाण, विजयश्री बारगळ, बळीराम केंद्रे, शेख फेरोजमियाँ खालेद यांचा समावेश आहे. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, सहायक निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे यांच्यासह सगळ्या सहकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांची पहाट आयुक्तालयात झाली.