औरंगाबाद : मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाने मंगळवारी स्थायी समिती सदस्य निवडण्याच्या प्रक्रियेत दोन नगरसेवकांचे उशिरा राजीनामे सादर करून महानगरपालिकेच्या राजकारणाला वेगळी कलाटणी दिली. ‘एमआयएम’ने सेनेला सभापतीपद मिळू नये यादृष्टीने हा डाव रचण्यात आल्याचे बोलले जात होते. बुधवारी भाजपने एमआयएमचा हा डाव सेनेसोबत मिळून असल्याचा आरोप करण्यात आला.महापालिकेत मंगळवारी स्थायी समितीचे आठ सदस्य निवडण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत एमआयएमचे गटनेते नासेर सिद्दीकी यांनी दोन सदस्यांची नावे महापौरांना दिली. महापौरांनी या दोन्ही सदस्यांची निवडही केली. निवडणूक प्रक्रिया संपल्यावर सिद्दीकी यांनी स्थायीमधील शेख समिना आणि विकास एडके यांचे राजीनामे सादर केले. या दोन्ही नगरसेवकांनी गटनेत्यांच्या नावाने राजीनामे दिले आहेत. महापौरांनी या राजीनाम्यांची वैधता तपासण्यासाठी ते विधि विभागाकडे त्वरित वर्ग केले.निवडणूक प्रक्रिया सुरू असतानाच एमआयएमने राजीनामे का दिले नाही. नगरसेवकाला स्थायी सदस्यत्वाचा राजीनामा महापौर अथवा आयुक्तांच्या नावाने देता येतो. गटनेत्याच्या नावाने राजीनामे का देण्यात आले, असे एक ना अनेक प्रश्न या खेळीमुळे उपस्थित झाले आहेत. स्थायी समितीचे सभापतीपद यंदा सेनेला मिळणार आहे. सेनेला सहजासहजी सभापतीपद मिळू नये म्हणून एमआयएमने भाजपसोबत ही खेळी केल्याची चर्चा मनपा वर्तुळात आहे. दरम्यान, बुधवारी भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी सांगितले की, आमचा एमआयएमशी असा कोणताही छुपा अजेंडा नाही. एमआयएम गलिच्छ राजकारण करीत आहे. त्यांनी दिशाभूल करणारे पाऊल उचलले आहे. सेनेसोबत मिळून ही खेळी केली असावी, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली. यंदा सेनेला सभापतीपद मिळवून देण्यात भाजप अजिबात मागे-पुढे पाहणार नाही. युतीमध्ये दरी निर्माण करण्यासाठी ही खेळी असू शकते. वेळेवर सेनेचा सभापती विराजमान होणार हे निश्चित. एमआयएममध्ये अंतर्गत लाथाळ्या जोरात सुरू आहेत. त्यांनी आपले अंतर्गत राजकारण सांभाळावे. त्यांच्या स्थानिक नेत्यांनी आपसातील वाद मिटवावेत, असा सल्लाही तनवाणी यांनी एमआयएमला दिला.‘एमआयएम’ने महापालिकेत भाजपसोबत कसा डाव खेळला यासंबंधीचे वृत्त ‘लोकमत’ने बुधवारी प्रकाशित केले होते.
भाजप म्हणते... खेळी सेना-एमआयएमची
By admin | Published: May 12, 2016 12:04 AM