औरंगाबादः पंतप्रधान नरेंद्र मोदींना पर्याय काय?, असा प्रश्न हल्ली विचारला जातो. पण, आपल्या देशाचा पंतप्रधान कोण होईल, यासाठी आत्तापर्यंत कधीच पर्याय दिले गेले नव्हते. मग ते पंडित नेहरू असोत, इंदिरा गांधी, लाल बहादूर शास्त्री किंवा राजीव गांधी. यावेळीही आपल्याकडे पंतप्रधानपदाला पर्याय नाही, पण २०१९ मध्ये भाजपा-शिवसेनेचं सरकार येणार नाही, असा ठाम विश्वास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज व्यक्त केला.
जातीचा माणूस पाहून मतदान होणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. भाजपा-सेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी मिळून राज्य खराब करताहेत. हेच सुरू राहिलं, तर महाराष्ट्र खड्ड्यात जाईल, असा धोकाही त्यांनी वर्तवला.
मराठवाडा दौऱ्याच्या पहिल्या दिवशी राज ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. त्यांच्या पत्रकार परिषदेतील काही मुद्दे असे...
>> मोदींना पर्याय काय?... पर्याय कधीपासून शोधायला लागलात तुम्ही?... कोणत्या पंतप्रधानाच्या वेळी तुम्हाला पर्याय होता?
>>नरेंद्र मोदींसारखा एक पंतप्रधान हवा, असं मीच पहिल्यांदा म्हटलं होतं. पण पंतप्रधान झाल्यावर माणूस फिरला. ते बदलल्यावर माझी भूमिका बदलली.
>> आपल्या देशाला पंतप्रधान ठरवण्याचा पर्याय कुठेय?... पण २०१९ ला हे सरकार परत येणार नाही. त्याची रणनीती ठरवेन मी.
>> मला मराठवाड्याची आठवण येत होती. पण बाकीचे नालायक ठरल्याशिवाय तुम्हाला आमची आठवण होत नाही.
>> ज्यांच्या हातात सत्ता दिलीत, त्यांनी तुमची विल्हेवाट लावलीय. राज्याचा सत्यानाश केलाय.
>> भाजपा ईव्हीएमचा फायदा घेऊन निवडणुका लढवतोय. नाहीतर, उमेदवारांना शून्य मतं कशी मिळू शकतात? नाशिकमध्येही तसाच निकाल आला.
>> नाशिकमध्ये कचराप्रश्नाचं नियोजन पाच वर्षांत करून दाखवलं. इथे २५ वर्षं जे सत्ता करताहेत त्या शिवसेनेला तुम्ही का विचारत नाही?
>> महापालिका खाऊन खाऊन रिकामी करण्यासाठी असते का?
>> माझ्या हातात सत्ता आल्याशिवाय काही करून दाखवू शकणार नाही.
>> मनसेच्या राज्य कार्यकारिणीत मराठवाड्याला स्थान असेल.