औरंगाबाद : नऊ वर्षांपासून मराठवाडा विकास मंडळ (पूर्वीचे मराठवाडा वैधानिक विकास मंडळ) अध्यक्षपदापासून वंचित होते. चार वर्षांपूर्वी राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेकडे मंडळ अध्यक्षपद जाणार, अशी चर्चा असतानाच दोन दिवसांपूर्वी भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड यांची अध्यक्षपदासाठी शासनाने वर्णी लावली. शिवसेनेकडून भाजपने हे मंडळ हिसकावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. सोमवारी डॉ.कराड पदभार घेते वेळी शिवसेनेचे महापौर वगळता सर्वच नेत्यांनी या कार्यक्रमाला दांडी मारली.
मराठवाडा, विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी १९९४ यावर्षी राष्ट्रपतींच्या आदेशावरून वैधानिक विकास मंडळाची स्थापना करण्यात आली. मराठवाडा विकास मंडळाचे पहिले अध्यक्ष होण्याचा बहुमान कमलकिशोर कदम यांना गेला. त्यानंतर युतीच्या राज्यात दिवाकर रावते, प्रताप बांगर यांनी अध्यक्षपद भूषविले. मधुकरराव चव्हाण यांनी १९९९ ते २००९ अशी दहा वर्षे मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम बघितले. चार वर्षांपासून येथील अध्यक्षपद सेना-भाजपच्या राजकारणात अडकले. शिवसेनेकडून राज्यमंत्री अर्जुन खोतकर, चिखलीकर यांच्या नावाची चर्चा होत राहिली. अखेरीस डॉ. कराड यांना अध्यक्षपद दिले. शिवसेनेकडे राज्यातील एकही विकास मंडळ आलेले नाही. प्रादेशिक समतोलाच्या धोरणांची अंमलबजावणी आणि विविध घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या मंडळांची भूमिका महत्त्वाची आहे. शिवसेनेला त्यापासून दूर सारून भाजपने प्रादेशिकदृष्ट्या स्वत:कडे मोठी राजकीय ताकद घेतल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.
विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, आ. प्रशांत बंब, महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, महापौर नंदकुमार घोडेले, विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर, मंडळाचे सचिव दीपक मुगळीकर यांच्यासह मंडळाचे सदस्य डॉ. कृष्णा लव्हेकर, शंकरराव नागरे, अशोक बेलखोडे, मुकुंद कुलकर्णी, भैरवनाथ ठोंबरे, माजी उपमहापौर संजय जोशी, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, संजय केणेकर, शिरीष बोराळकर उपस्थित होते.
सर्वांगीण विकासाचा दावा मराठवाड्याचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न राहील. विभागातील सिंचन, शैक्षणिक, तसेच इतर क्षेत्रांत असणारा अनुशेष मंडळ दूर करील. जास्तीचा निधी आणून सर्वसामान्यांसाठी असणाऱ्या योजनांचा लाभ तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्यास मंडळाचे प्राधान्य असेल, असे मराठवाडा विकास मंडळाचे नवनियुक्तY अध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, डॉ. कराड यांनी सांगितले, मंडळ नियुक्तीमध्ये कुठलेही राजकारण झालेले नाही.