लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शिवसेना-भाजप युतीमध्ये मागील काही दिवसांपासून सुंदोपसुंदी सुरूहोती. रविवारी दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकत्र बसून या सुंदोपसुंदीला पूर्णविराम दिला. महापौरपदासाठी सेनेच्या उमेदवाराला भाजपकडून जाहीरपणे पाठिंबा देण्यात आला. त्यामुळे रविवार, दि.२९ आॅक्टोबर रोजी होणा-या महापौरपदाच्या निवडणुकीत सेनेच्या उमेदवाराचा मार्ग मोकळा झाला आहे.भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, आ. अतुल सावे, डॉ. भागवत कराड, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, महापौर बापू घडमोडे, बसवराज मंगरुळे, प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर, संजय केणेकर आणि सेनेकडून खा. चंद्रकांत खैरे, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, जिल्हाध्यक्ष मुन्ना त्रिवेदी, सुहास दाशरथे, नंदकुमार घोडेले, राजू वैद्य, बाळू थोरात यांची जालना रोडवरील हॉटेलमध्ये संयुक्त बैठक झाली. यावेळी प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी युतीधर्म पुढे अडीच वर्षे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. सेनेकडून याचे जोरदार समर्थन करण्यात आले. दोन्ही नेत्यांनी एकमेकांना पेढे भरवून आनंद द्विगुणित केला.यावेळी पत्रकारांशी बोलताना खा. चंद्रकांत खैरे यांनी सांगितले की, अडीच वर्षांपूर्वी शिवसेना-भाजप युतीमध्ये लिखित स्वरूपात एक करार झालेला आहे. या करारानुसारच यापुढेही काम करण्याचे दोघांनी ठरविले आहे. शहराच्या विकासासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे एकत्रितपणे काम करण्यावर एकमत झाले. आगामी अडीच वर्षांत भाजपला जी पदे देण्याचे निश्चित झाले आहे, त्यात किंचितही बदल होणार नाही. युतीमध्ये पूर्वी जसे ठरले होते त्याच पद्धतीने करार पुढे जाईल. २५ आॅक्टोबर रोजी दोन्ही पक्षांचे नगरसेवक सहलीवर जाणार आहेत. २९ आॅक्टोबर रोजी सकाळी युतीचे सर्व नगरसेवक थेट महापालिकेत दाखल होतील.
सेनेचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 1:26 AM