जिल्हा परिषद निवडणूकीत भाजपची शरणागती; शिवसेनेची नाचक्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 12:06 PM2020-01-04T12:06:57+5:302020-01-04T12:15:14+5:30
या सर्व प्रकारात भाजपने शिवसेनेला धडा शिकविण्यासाठी बंडखोरासमोर शरणागती पत्करल्याचे पाहायला मिळाले, तर शिवसेना नेतृत्वाने दिलेला आदेश धुडकावून राज्यमंत्री सत्तार व अॅड. डोणगावकर यांनी शिवसेनेची नाचक्की केल्याची चर्चा सुरू आहे.
- राम शिनगारे
औरंगाबाद : राज्यात गेल्या महिन्यात केलेला महाविकास आघाडीचा प्रयोग तीन वर्षांपूर्वीच शिवसेना व काँग्रेसने जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी केला होता. त्यावेळी ठरलेल्या सत्ता समीकरणानुसार अडीच वर्षांनंतर काँग्रेसला अध्यक्षपद देण्याचा शब्द शिवसेनेने पाळला. मात्र, शिवसेनेच्या विद्यमान जि.प. अध्यक्ष अॅड. देवयाणी डोणगावकर यांची बंडखोरी आणि शिवसेनेचेच राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी ‘मातोश्री’चा आदेश धुडकावत शिवसेनेची नाचक्की केल्याचे चित्र उमटले, तसेच जिल्हा परिषदेत सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपनेही शिवसेनेच्या बंडखोरासाठी शरणागती पत्करणे पसंत केले. भाजपने उमेदवार उभा केलेला असताना शिवसेना बंडखोराला मतदान करण्याचा निर्णय घेतला. याची चर्चा जि.प. वर्तुळात दिवसभर सुरू होती.
औरंगाबाद जि. प. अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया थांबवली
जिल्हा परिषदेत एकूण ६२ सदस्य आहेत. प्रा. रमेश बोरनारे हे वैजापूरचे आमदार झाल्यामुळे त्यांचे पद रिक्त आहे. त्यामुळे जि.प.ची सदस्य संख्या ६१ वर आलेली आहे. निवडणुकीत अध्यक्ष, उपाध्यक्ष होण्यासाठी ३१ सदस्यांची आवश्यकता होती. भाजप २३, शिवसेना १८, काँग्रेस १६ (त्यात सत्तार समर्थक ६), राष्ट्रवादी २, मनसे व रिपाइं (डी)कडे प्रत्येकी १ सदस्य आहे. महाविकास आघाडीच्या सदस्यांची संख्या ३६ वर पोहचते. त्यामुळे महाविकास आघाडीची सत्ता येणार असल्याचे स्पष्ट झाले होते. तीन वर्षांपूर्वी ठरलेल्या सत्तावाटपाचा शब्द पाळत शिवसेनेच्या नेतृत्वाने काँग्रेसला अध्यक्षपद देण्याचे आदेश दिले. मात्र, शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार समर्थक ६ सदस्यांना सोबत घेत शिवसेनेच्या अॅड. देवयानी डोणगावकर यांनी बंडखोरी केली. त्यांच्या बंडखोरीला भाजपने साथ दिली.
जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीत ‘हाय व्होल्टेज ड्रामा’
भाजपकडून अनुराधा चव्हाण यांनी उमेदवारी दाखल केली. ही उमेदवारी मागे न घेताच त्यांनीसुद्धा अॅड. डोणगावकर यांना मतदान केले. मात्र, भाजपची एक सदस्या छाया अगरवाल अनुपस्थित राहिल्या, तर भाजपचा एक सदस्य फुटून त्याने महाविकास आघाडीला मतदान केले. त्यामुळे भाजपचे संख्याबळ २१ वर आले. सत्तार समर्थक ६ सदस्य, शिवसेनेचा एक आणि इतर एकाने अॅड. डोणगावकर यांना मतदान केले. त्यामुळे त्यांचे संख्याबळ हे २९ वर पोहोचले, अशी माहिती उपस्थित सदस्यांनी दिली. काँग्रेसच्या उमेदवार मीना शेळके यांना काँग्रेसचे १०, शिवसेनेचे १५, राष्ट्रवादीचे २, भाजपचे एक आणि इतर एकाने मतदान केले. त्यामुळे त्यांचेही संख्याबळ २९ वर पोहोचल्याचे सदस्यांनी स्पष्ट केले. मात्र, शिवसेनेच्या सदस्या मोनाली राठोड यांच्या मतदानावरून गोंधळ उडाला. त्याचेवळी शिवसेनेच्या शीतल बनसोड आणि मनीषा सिदलंबे यांनी मतदानाला अनुपस्थित राहत अप्रत्यक्षरीत्या भाजपलाच मदत केल्याची चर्चा आहे. या सर्व प्रकारात भाजपने शिवसेनेला धडा शिकविण्यासाठी बंडखोरासमोर शरणागती पत्करल्याचे पाहायला मिळाले, तर शिवसेना नेतृत्वाने दिलेला आदेश धुडकावून राज्यमंत्री सत्तार व अॅड. डोणगावकर यांनी शिवसेनेची नाचक्की केल्याची चर्चा सुरू आहे.
शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर
जि.प.चे अध्यक्षपद शिवसेनेकडे ठेवण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून आग्रह धरण्यात येत होता. अब्दुल सत्तार यांनी पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांना राज्यमंत्री करण्यात आले. त्यामुळे त्यांचे समर्थक सदस्यही शिवसेना पक्षाचा आदेश पाळतील, असा विश्वास शिवसेनेच्या नेत्यांना होता. त्याचवेळी शिवसेनेत अध्यक्षपद मिळविण्यासाठी मोठी स्पर्धा होती. कन्नड तालुक्यातील शुभांगी काजे, अॅड. देवयानी डोणगावकर यांच्यासह इतर स्पर्धेत होते. यातील कोणीही अध्यक्ष झाले असते, तर आगामी विधानसभा निवडणुकीत कन्नड, गंगापूरमधून विधानसभेची दावेदार बनले असते. त्यामुळे संभाव्य उमेदवारांचा आताच पत्ता कट करण्यासाठी पक्षातूनच खेळी झाल्याची चर्चा आहे. यातून अध्यक्षपद काँग्रेसला सोडण्यात आले. त्याचवेळी राज्यमंत्री सत्तार यांना काँग्रेसला अध्यक्षपद मिळू द्यायचे नसल्यामुळे त्यांनी बंडाचा पवित्रा घेतल्याचे बोलले जाते. कृष्णा पाटील डोणगावकर यांनी विधानसभेच्या वेळी भाजपचे उमेदवार प्रशांत बंब यांना सहकार्य केल्यामुळे त्यांनी त्याची परफेड म्हणून अध्यक्षपदासाठी भाजपचे सहकार्य दिले. तसेच शिवसेना प्रवेशासाठी राज्यमंत्री सत्तारांना पाटील यांची मदत झालेली असल्याचे बोलले जाते. यातून बंडखोरी झाल्याची चर्चा आहे. मात्र, हे बंड फसले असून, त्याची किंमत कृष्णा पाटील डोणगावकर आणि राज्यमंत्री सत्तार यांना चुकवावी लागेल, असेही शिवसेनेच्या गोटात चर्चा आहे.