औरंगाबादमध्ये भाजपा वार्ड अध्यक्षाची आत्महत्या, काँग्रेस कार्यकर्त्याला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 03:34 PM2019-03-11T15:34:52+5:302019-03-11T15:35:13+5:30
सुनील ने आत्महत्या पूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली आहे.
औरंगाबाद: जय भवानी नगर वार्ड क्रमांक 92 चे भारतीय जनता पार्टीच्या वार्ड अध्यक्षाने रविवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. एका महिलेच्या आणि काँग्रेस नगरसेविकेच्या पतीने दिलेल्या त्रासामुळे आत्महत्या करत असल्याचे सुसाईड नोटमध्ये त्यांनी नमूद केले आहे. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सुनील प्रल्हाद अहिरे (35) राहणार जय भवानी नगर गल्ली नंबर 14 असे आत्महत्या केलेल्या भाजपा कार्यकर्त्याचे नाव आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपींना तातडीने अटक करावी या मागणीसाठी आमदार अतुल सावे आणि मृताच्या नातेवाइकांनी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यासमोर सुमारे तासभर ठिय्या दिला यावेळी पोलिस अधिकारी आणि आमदारांमध्ये शाब्दिक वाद झाला.
छाया मनोहर लोखंडे (वय 35, राहणार शिवशक्ती नगर) आणि मोहन नाना साळवे (55) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. या विषयी अधिक माहिती अशी की. सुनील अहिरे आणि छाया लोखंडे यांच्यामध्ये मागील सहा वर्षापासून प्रेम संबंध होते. मात्र गेल्या काही महिन्यापासून त्यांच्यात वाद सुरु झाला होता. याप्रकरणी पंधरा दिवसापूर्वी मयताची पत्नी मीरा हिने छाया विरोधात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. तेव्हापासून छाया आणि सुनील यांच्यातील वाद अधिक विकोपाला गेला होता.
दरम्यान, सुनील यांनी रविवारी (दि. 10) रात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुनील ने आत्महत्या पूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली. या चिठ्ठीमध्ये त्यान छाया लोखंडे आणि मोहन नाना साळवे यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे लिहून ठेवले आहे. या चिठ्ठीच्या आधारे आरोपीविरोधात गुन्हा नोंदवावा आणि त्यांना अटक करावी अशी मागणी नातेवाईकांनी पोलिसांकडे केली होती.