औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचे निकाल ४ डिसेंबर रोजी जाहीर झाल्यानंतर भाजपाच्या गोटात कमालीची शांतता पसरली आहे. चार लोकसभा, एक राज्यसभा असे पाच खासदार, १७ आमदारांसह नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत सदस्यांपर्यंत असलेली नेतृत्वाची फळी असतानादेखील पदवीधर निवडणुकीत असलेले भाजपाचे उमेदवार शिरीष बोराळकर यांना ५७ हजार ८९५ मतांनी पराभव झाला. राष्ट्रीय पक्षाची झीरो ग्राऊंडवर ताकद असताना एवढी दाणादाण होणे हे निवडणुकीत गटबाजी न मानता पक्ष म्हणून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे मनोबल खचविणारे आहे. एवढी मोठी राजकीय ताकदीची सद्दी असताना रद्दी होण्यासारखा पराभव साधा नसून यामध्ये भविष्यातील अनेक चांगले-वाईट परिणाम आणि बदल दडलेले दिसत आहेत.
बोराळकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून अंतर्गत विरोधाची लाट उसळली. २०१४ साली ते पराभूत झाले होते. त्यामुळे यावेळी उमेदवार बदलण्याची मागणी होती, परंतु विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या कृपेने त्यांची उमेदवारी निश्चित झाली. माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी तर एकाची उमेदवारी कापून आल्याचे जाहीर वक्तव्य बोराळकरांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी केले होते. त्यातून अनेक तर्कवितर्क लावले गेले. उमेदवाराच्या विरोधात सोशल मीडियातून जाहीरपणे प्रचार झाला. दरम्यान, याच काळात माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी भाजपाला राम-राम केला. प्रवीण घुगे यांची बंडखोरी भाजपाने घरी जाऊन शमविली, मात्र, आपल्याकडे कुणी आले नाही, याची सल मनाला दुखावून गेल्याने गायकवाड राष्ट्रवादीच्या तंबूत गेले. याचाही फटका भाजपाला बसला. सोबत रमेश पोकळे, सिध्देश्वर मुंडे, नागोराव पांचाळ, सचिन ढवळे या उमेदवारांनी घेतलेली मते भाजपाचीच होती. बाद झालेल्या विक्रमी मतदानातील निम्मे मते भाजपाच्या हातून फक्त उमेदवारी लादल्याच्या वादामुळे गेली. शिवाय पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत मतदारनोंदणी हा पाया असतो. बोराळकर यांनी केलेल्या नोंदणीवरच आता पक्षनेतृत्व संशयाने पाहू लागले आहे. भाजपाच्या एका माजी मंत्र्याने विजयी उमेदवार सतीश चव्हाण यांच्याकडेच नोंदणीत केलेल्या दिशाभूलीबाबत चर्चा केली आहे. बोराळकर, घुगे आणि बसवराज मंगरूळे यांनी केलेल्या मतदार नोंदणीचे आकडे पक्षाला विजयापर्यंत नेऊ शकली नाहीत. याचा अर्थ बोराळकरला जी मते मिळाली, ती सर्वंकष नाहीत. पक्षातील अंतर्गत वादामुळे सद्दी असताना रद्दी होण्यासारखा पराभव झाला यावरून भाजपात भयान शांतता पसरली आहे. जो मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला होता, त्यावर राष्ट्रवादीने दीड तपापासून निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. आता भाजपाला सर्वंकष सोशल इंजिनिअरींगचा विचार करूनच उमेदवारी देण्याचा विचार करावा लागेल. बहुजन मतदारांना गृहित धरुन भाजपाला महाविकास आघाडीशी लढा देता येणार नाही, सध्या तरी असेच दिसते आहे.
चव्हाणांनी वैयक्तिक नेटवर्कवर हॅटट्रीकचा पल्ला गाठला
शिवसेना-काँग्रेसचे मिळाले बळ: नियोजन आणि यंत्रणेच्या जोरावर विजय १२ वर्षांपासून पदवीधर मतदारसंघावर एकतर्फी पकड असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आ.सतीश चव्हाण यांनी पुढील सहा वर्षांसाठी मतदारसंघावर ताबा मिळविला आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेरसची साथ जरी त्यांना यावेळी असली तरी त्यांचे मतदारसंघात वैयक्तिक नेटवर्क आहे. त्या नेटवर्कच्या जोरावरच त्यांनी विजयाची हॅटट्रिक साधण्याचा पल्ला गाठला आहे. १ लाख ३० हजार मते पडतील, असा त्यांचा दावा त्यांना मिळालेल्या मताधिक्क्यावरून दिसतो आहे. भाजपातील अंतर्गत बंडाळीचा पूर्ण फायदा घेत त्यांनी नियोजित प्रचार केला. मतदार नोंदणीचे पूर्ण कसब ज्ञात असल्यामुळे नोंदणीपासून मतदान होईपर्यंत आणि त्यानंतर पुन्हा पुढील निवडणुकीपर्यंत तयारीनिशी काम करण्याची त्यांची यंत्रणा सक्षम आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकर्त्यांची मोठी फळी नसतानाही त्यांनी सेल्फ मॅनेजमेंटवर ही निवडणूक एकहाती जिंकली. राष्ट्रवादीतही अंतर्गत धुसफूस आहेच. जिल्ह्यात पक्षसंघटन कमकुवत आहे. परंतु आता महाविकास आघाडीतील शिवसेना आणि काँग्रेसची साथ मिळाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला बळ मिळाले आहे.
पहिल्या पसंतीमध्ये काही धक्का बसल्यास दुसऱ्या पसंतीची देखील तयारी आ.चव्हाण यांनी गनिमीपध्दतीने करून ठेवली होती. मतमोजणी दरम्यान दुसऱ्या पसंतीची सर्वाधिक मते चव्हाण यांना मिळाल्याचे दिसून आले. परंतु पहिल्या पसंतीच्या मतांवरच चव्हाण यांनी वैध मतांचा कोटा पूर्ण करीत हॅटट्रिक साधली.
विकास राऊत