औरंगाबाद : भाजपा- सेनेचे नाते काय? पाहुणे की सोयरे? एकमेकांचे नैसर्गिक मित्र, हितचिंतक की शत्रू, असा प्रश्न शुक्रवारी औरंगाबादेत निर्माण झाला. याला कारण जलसंपदामंत्री राम शिंदे यांनी अलीकडेच केलेले वक्तव्य.... ‘जनावरांना चारा नसेल तर ती मग पाहुण्यांकडे नेऊन घाला’ या शिंदे यांच्या वक्तव्याचा महाराष्ट्रभर विशेषत: काँग्रेसकडून निषेध होत असताना आज त्यात औरंगाबादच्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांनी व शिवसेनेच्याच जिल्हा परिषद अध्यक्षांच्या पतीने उडी घेतली. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या अजबनगर येथील कार्यालयापासून निघायचे आणि उस्मानपुरा येथील भाजप कार्यालयावर धडक मारायची असे ठरलेले. त्याप्रमाणे दानवे यांच्या कार्यालयाजवळ शिवसैनिक जमले. जि.प.च्या अध्यक्षा अॅड. देवयानी डोणगावकर यांचे पती कृष्णा पाटील-डोणगावकर यांनी डोणगाव (ता. गंगापूर) येथून तीन खिल्लारी बैल आणले होते. मोर्चा निघण्यापूर्वीच क्रांतीचौक पोलिसांनी तो अडवला व बैलांसह शिवसैनिकांना ताब्यात घेतले. चौंडीत आंदोलन दडपले. राम शिंदे यांच्या चौंडी येथील बंगल्यासमोर जनावरे बांधण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन शुक्रवारी पोलिसांनी बळाचा वापर करीत मोडून काढण्यात आले. चौंडीकडे जाणारे सर्व मार्ग पोलिसांनी अडविले होते. आंदोलनामुळे चौंडी गावास पोलीस छावणीचे स्वरूप आले होते, अशी माहिती एका आंदोलनकर्त्याने ‘लोकमत’ला दिली.>पोलिसांनी रोखला मोर्चाउस्मानपुरा येथील भाजपा कार्यालयासमोर शिवसेनेच्या ‘पाहुणचारा’साठी भाजपाचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते तयारीतच होते. हिरवा चारा, उसाची कुट्टी, कडबा व पाण्याची सोय त्यांनी केलेली; पण इकडे पोलिसांनी शिवसेनेचा मोर्चा रोखल्यामुळे भाजपा पाहुणचार करण्याच्या संधीस मुकली.
भाजपा- शिवसेनेचे नाते काय? एकमेकांचे पाहुणे की सोयरे?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2018 5:20 AM