फुलंब्री : तालुक्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुका संदर्भात भाजपच्या वतीने गावनिहाय बैठका घेतल्या जात आहेत. विशेष म्हणजे भाजपने ग्राम निवडणुकांसाठी चांगलीच कंबर कसली असून प्रत्येक गावात पक्षाचे स्वतंत्र पॅनल तयार करण्यावर भर दिला जाणार आहे, असा निर्णय भाजपच्या बैठकीत घेण्यात आला.
फुलंब्री तालुक्यात १५ जानेवारीला ५३ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहे. याकरिता सर्वच राजकीय पक्षाच्या वतीने गावपातळीवर आपली पकड मजबूत होण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. त्या अनुषंगाने तालुक्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी गावनिहाय बैठका घेण्याचा झपाटा सुरू केला आहे. तर पक्षाच्या वतीने स्वतंत्र पॅनल उभे करण्याची रणनिती आखली जात आहे.
शेतकरी कष्टकरी ग्रामविकास पॅनल या नावाने पॅनल तयार केले जाणार असून यामध्ये प्रामुख्याने भाजपा कार्यकर्त्यांचा समावेश असणार आहे, तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतीवर भाजपप्रणीत पॅनलची सत्ता आली पाहिजे, यासाठी कार्यकर्ते कामाला लागले आहेत. त्यात भाजपला यश नक्की येईल, असा विश्वास भाजप तालुकाध्यक्ष सुहास सिरसाठ यांनी व्यक्त केला.
-----
तालुक्यात हे आहेत स्टार प्रचारक
माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, भाजपा तालुका अध्यक्ष सुहास सिरसाठ, जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव पाथ्रीकर, जि.प. सभापती अनुराधा चव्हाण, पंचायत समिती सभापती सविता फुके, महिला आघाडीच्या अध्यक्षा ऐश्वर्या गाडेकर, योगेश मिसाळ, राम बनसोड, बाळासाहेब तांदळे, गजानन नागरे यांची नुकत्याच झालेल्या बैठकीत उपस्थिती होती. तालुक्यातील या नेत्याच्या माध्यमातून ५३ ग्रामपंचायतीवर लक्ष ठेवले जात असून विजयी होण्यासाठी गावभेटीवर लक्ष दिले जात आहे.