छत्रपती संभाजीनगर : 'शासन आपल्या दारी' या उपक्रमात भाजपचे पदाधिकारी व प्रशासन मिळून जनतेपर्यंत सरकारचे धोरण पोहोचविणार आहे असे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शनिवारी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पदाधिकारी आणि अधिकारी यांच्या समन्वय बैठकीत ते बोलत होते.
यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, सहकारमंत्री अतुल सावे, आमदार हरिभाऊ बागडे, आमदार प्रशांत बंब, जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय, महापालिका आयुक्त जी. श्रीकांत, पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया, पोलिस आयुक्त मनोज लोहिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मिना, मंगेश गोंदावले, भाजप शहराध्यक्ष शिरीष बोराळकर, प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
सरकारतर्फे शासन आपल्या दारी हा उपक्रम आपण राबविण्यात येणार आहे. यासाठी भाजप पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून वार्डा-वार्डांत हा उपक्रम राबवीत सरकारी योजना, धोरण सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविणार आहेत. यासाठी महसूल विभागाचे अधिकारी काम करणार आहेत, असेही मंत्री विखे यांनी सांगितले. बैठकीत मांडण्यात आलेल्या समस्यांवर जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याच्या सूचना मंत्र्यांनी दिल्या. झिरो तलाठी, जिल्ह्यातील प्रलंबित असलेले जमीन मोजणीचे कामे तत्काळ करावीत अशा सूचना केल्या. आमदार हरिभाऊ बागडे यांनी पाल येथील शेतकऱ्यांच्या जमिनीवर पडलेल्या बोजासंदर्भात प्रश्न उपस्थित केला. यासंदर्भात मंत्री विखे पाटील यांनी सूचना केल्या.