"भाजपचा ईडीच्या माध्यमातून 'काँग्रेस तोडो'चा प्रयत्न"; औरंगाबादेत कॉंग्रेसची आक्रमक निदर्शने
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 05:32 PM2022-07-21T17:32:32+5:302022-07-21T17:34:57+5:30
काँग्रेस पक्षाने उदयपूरच्या शिबिरामध्ये 'भारत जोडो'ची भूमिका घेतली होती. याची धास्ती घेऊन भाजपने ईडीच्या माध्यमातून 'काँग्रेस तोडो'चा प्रयत्न सुरु आहे
औरंगाबाद: सोनिया गांधी यांची ईडी अधिकारी चौकशी करत आहेत. मात्र, सोनिया गांधी यांच्या ईडी चौकशीला विरोध करत देशभर काँग्रेस नेते, कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. औरंगाबादेतही आज दुपारी विभागीय आयुक्तालयासमोर मराठवाडास्तरीय निदर्शने करण्यात आली. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येऊन ईडीच्या चौकशीचा निषेध करण्यात आला.
औरंगाबाद येथे मराठवाडा विभागाच्यावतीने काँग्रेस कमिटीतर्फे आयोजित आंदोलनामध्ये सोनिया गांधी यांच्या ईडी चौकशीचा निशेष व्यक्त करण्यात आला. भाजप सरकार सातत्याने गांधी परिवारावर सूडबुद्धीने कारवाई करत असून देशातील लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न करत आहे, अशा तीव्र प्रतिक्रिया आंदोलकांनी व्यक्त केल्या. काँग्रेस पक्षाने सातत्याने जनतेचे प्रश्न उपस्थित केल्यामुळे केंद्रातील भाजप सरकारच्या पायाखालची वाळू सरकली आहे. याचमुळे काँग्रेसविरोधात केंद्रीय यंत्रणांचा वापर करत भाजप दडपशाही करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
काँग्रेस पक्षाने उदयपूरच्या शिबिरामध्ये 'भारत जोडो'ची भूमिका घेतली होती. याची धास्ती घेऊन भाजपने ईडीच्या माध्यमातून 'काँग्रेस तोडो'चा प्रयत्न सुरु आहे, असा संताप आंदोलकांनी केला. तसेच तपास यंत्रणांचा गैरवापर आणि पोलिसांना पुढे करून सुरु असलेल्या या दडपशाहीला कधीच भीक घालणार नाही. मोदी सरकारच्या मनमानी कारभाराविरोधात कॉंग्रेस लोकशाही मार्गाने संघर्ष करत राहील, असा इशारा देखील आंदोलकांनी दिला. आंदोलनात मराठवाड्यातील सर्व जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.