औरंगाबाद : राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या जाहीर सभेत भाजपाने सोमवारी औरंगाबाद लोकसभा निवडणूक लढण्याचे रणशिंग फुंकले. शिवसेनेचे माजी खा. चंद्रकांत खैरे आणि विद्यमान खा. इम्तियाज जलील यांचे नाव न घेता सभेमध्ये टीका करण्यात आली. बाळासाहेबांच्या शिवसेनेशी युती करून भाजपा औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढविणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड म्हणाले, चारवेळा शिवसेना-भाजपा युतीचा खासदार होतो. प्रत्येक वेळी युतीमध्ये लढलो. मात्र, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने भाजपाला दगा दिला. महाविकास आघाडीशी युती केली. अडीच वर्षांत १० वर्षे राज्य मागे गेले. पिण्याच्या पाण्याची योजनाही पूर्णत्वास नेली नाही. एमआयएमचा खासदार अपघाताने निवडून आला आहे. माजी व विद्यमान खासदाराने थापा मारण्याचे काम केले आहे. २० वर्षांत शिवसेनेच्या खासदाराने व एमआयएमने अलीकडच्या काळात केलेले काम दाखवावे, असे आव्हान कराड यांनी दिले. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले, भाजपा लोकसभेत ३५० हून अधिक जागा जिंकेल.
बाळासाहेबांच्या शिवसेनेचे कुणीच नाही....बाळासाहेबांच्या शिवसेनेचे पाच आमदार जिल्ह्यात असताना त्यांना सभेसाठी निमंत्रित केले नव्हते. कारण ही पक्षाची स्वतंत्र सभा होती. परंतु लोकसभा निवडणूक बाळासाहेबांच्या शिवसेनेला सोबत घेऊन लढणार असल्याची घोषणा करण्यात आली.
नड्डांच्या २० मिनिटांच्या भाषणात काय...राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी २० मिनिटांचे भाषण केले. मोदी सरकारच्या काळात राबविण्यात आलेल्या योजनांवर त्यांनी १२ मिनिटे भाषण केले. देशात कोणत्या योजनेचा लाभ कुणाला मिळाला, यावर चार मिनिटे, तर महाविकास आघाडी सरकारवर ४ मिनिटांचे टीकात्मक भाषण केले.
केणेकर व पोलिसांत वाद....प्रवेशावरून प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर आणि पोलिस निरीक्षक पोटे यांच्यात वाद झाला. नेत्यांच्या मध्यस्थीनंतर प्रकरण मिटले.काळे कपडे घातलेल्यांना रोखले...सभेला काळे कपडे, जॅकेट घालून आलेल्यांना पोलिसांनी प्रवेशद्वारावरच राेखले. त्यामुळे अनेकजण बाहेरच थांबले.
नियोजनात स्थानिक कमी पडले? पाच दिवसांत सभेचे नियोजन करण्यात आले. नियोजनात स्थानिक नेते कमी पडले का, अशी चर्चा सुरू झाली आहे. कारण गर्दी, शहर व ग्रामीण नेतृत्व, संवादाचा अभाव दिसून आल्याचे बाेलले जात आहे. सभेला उशीर व इतरांची लांबलेली भाषणे यामुळे नड्डा सभास्थळी येईपर्यंत अनेकांनी मैदान सोडले होते.
गर्दीला थांबविण्यासाठी नेते मैदानात---सभेसाठी आलेले नागरिक जाऊ नयेत, यासाठी व्यासपीठावरील काही पदाधिकारी गर्दीत जाऊन नागरिकांना थांबवून खुर्च्यांवर बसवीत होते, तर दुसरीकडे अनेक नेत्यांना भाषणाचीही संधी मिळाली नाही. सभेतील रिकाम्या खुर्च्यांमुळे सोशल मीडियातून विरोधकांनी सभेवर जोरदार मिश्कील टिप्पणी केली, तर सभेला उशीर झाल्यामुळे लोकं गेल्याचे स्पष्टीकरण भाजपाने दिले.