औरंगाबाद : ‘नवनव्या जुमलेबाजीला कंटाळलेल्या जनतेच्या मनात भडकलेला असंतोषच आगामी निवडणुकीत भाजप-सेनेला हरवण्यास कारणीभूत ठरेल,’ असे आज येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. याचवेळी त्यांनी महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणासाठी केंद्र सरकारने पाच हजार कोटींची आर्थिक मदत करावी, अशी मागणी केली. गंभीर दुष्काळ व मध्यम दुष्काळ असा शब्दांचा खेळ बंद करून दुष्काळग्रस्तांना भरीव अशी काय मदत करणार, हे सरकार का जाहीर करीत नाही ? असा संतप्त सवाल चव्हाण यांनी विचारला.
गुरुवारी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर जनसंघर्ष यात्रेच्या जाहीर सभेपूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते. मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीतच अशोक चव्हाण यांनी युती सरकारच्या चार वर्षांच्या कारभाराची चिरफाड करायला सुरुवात केली. खरगे हे मध्येच उठून गेल्यामुळेही त्यांचा व पत्रकारांचा संवाद होऊ शकला नाही. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांचे विमान औरंगाबादला पोहोचले नव्हते. त्यामुळे ते पत्रपरिषदेस उपस्थित नव्हते. महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना परवाच्या दिवशी जायकवाडी पाणी प्रश्नावरून असंतोषास सामोरे जावे लागले होते. आजच्या पत्रपरिषदेत हा प्रश्न आला; पण उत्तर द्यायला विखे पाटील नव्हते.
परिवर्तन होणारचआम्ही जनसंघर्ष यात्रा सुरू केली आहे. आतापर्यंत अठरा जिल्ह्यांमध्ये ही यात्रा फिरली. हे सरकार जात नाही तोपर्यंत आमचा संघर्ष चालूच राहणार आहे. राज्यात परिवर्तन होईल, असा विश्वास खा. चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला.
शेवटची घंटा वाजवली‘युती सरकारची चार वर्षे’ असे लिहून त्याखाली एक घंटा ठेवलेली होती. ही घंटा वाजवण्याचा मान अ.भा. काँग्रेसचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांना देण्यात आला. पत्रपरिषदेतच हा कार्यक्रम झाला. एक अर्जंट फोन कॉलवर बोलण्यासाठी खरगे पत्रपषिदेतून उठून गेले होते. बराच वेळ ते आले नाहीत; पण त्यांच्याच हस्ते युती सरकारची शेवटची घंटा वाजवायची होती. त्यामुळे त्यांची प्रतीक्षा सुरू होती. ते येईपर्यंत काँग्रेसच्या सोशल मीडियाने तयार केलेले ‘मेरे अच्छे दिन कब आयेेंगे’ हे गीत ऐकवण्यात आले. खरगे यांना बोलावून आणण्यासाठी प्रदेश प्रवक्ते राजू वाघमारे व अन्य काही जणांना पाठवण्यात आले. शेवटी मल्लिकार्जुन खरगे आले आणि त्यांनी युती सरकारच्या शेवटच्या घंटेची दोरी हातात धरून ती वाजवली.