छत्रपती संभाजीनगर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मराठवाड्यावर फोकस करण्यासाठी पूर्ण ताकद लावली आहे. छत्तीसगढमधील २५ नेत्यांना विभागातील डेंजर झाेनमध्ये असलेले मतदारसंघ दत्तक दिल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत मंगळवारी सायंकाळी सहा वाजता एमजीएम कॅम्पसमधील रुख्मिणी सभागृहात मराठवाड्यातील भाजप नेते, पदाधिकाऱ्यांचा मेळावा होत आहे.
लोकसभेत दारुण पराभव झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री शाह संघटनेच्या अनुषंगाने एक तास बौद्धिक घेणार आहेत. या बैठकीत गृहमंत्री शाह हे काही पदाधिकाऱ्यांना थेट प्रश्न विचारून बूथनिहाय सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतील. लोकसभा निवडणुकीत भाजपला मराठवाड्यात यश मिळाले नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीचे नियाेजन काटेकोर होईल, तसेच महायुतीमध्ये जागा वाटप समाधानकारक होण्याच्या अनुषंगाने गृहमंत्री शाह यांच्या दाैऱ्याला महत्त्व आले आहे. मार्चनंतर शाह यांचा हा दुसरा दौरा आहे. छत्तीसगड येथील भाजपाचे काही नेते गेल्या महिन्यात शहरात येऊन गेले. मराठवाड्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेत शाह विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेताना पाच ते सात मिनिटांत सर्वांचे म्हणणे ऐकतील. त्यानंतर ते मार्गदर्शन करतील. या बैठकीस केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सहसंघटनमंत्री शिवप्रकाश, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, माजी खा. रावसाहेब दानवे, खा. डॉ. भागवत कराड, खा. अशोक चव्हाण, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, आ. पंकजा मुंडे, राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर, खा. अजित गोपछडे, प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर, शहराध्यक्ष शिरीष बोराळकर, जिल्हाध्यक्ष संजय खंबायते, सुहास शिरसाट यांची उपस्थिती राहणार आहे. मराठवाड्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संघटनात्मक आढावा व संवाद बैठक पार पडणार आहे.
जिल्हानिहाय होणार आढावामराठवाड्यातील आठही जिल्ह्यांचा आढावा केंद्रीय गृहमंत्री शाह घेतील. बुथ, मंडळनिहाय प्रवास झाला आहे काय, बैठकीत अचानक कुणाला तरी प्रश्न विचारतील. आगामी निवडणुकीसाठी काय केले पाहिजे. जिल्हानिहाय पाच ते सात मिनिटे मिळतील. मोजक्यांना बोलण्याची संधी आहे. कार्यकर्त्याला वन टू वन प्रश्न विचारल्यास त्याचाही आत्मविश्वास वाढेल. प्रदेश पदाधिकारी कार्यकारिणी सदस्य, सरचिटणीस, जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, मोर्चा अध्यक्ष, प्रभारी जिल्हा संयोजक, विधानसभा अध्यक्ष, आजी-माजी खासदार, विस्तारकांना या बैठकीसम मेळाव्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.