औरंगाबाद : भाजपचे माजी शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी भाजपला राम राम करीत बुधवारी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. तनवाणी यांच्या समवेत माजी महापौर गजानन बारवाल, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांनीही प्रवेश केला.
तनवाणींना पक्षात घेतले असले तरी त्यांच्यासोबत जे येतील त्यापैकी जे सक्षम असतील त्यांनाच उमेदवारी देऊ, असे स्पष्टीकरण शिवसेना नेते, लोकप्रतिनिधींनी ‘लोकमत’शी बोलताना दिले. तनवाणी यांच्यासोबत भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. महानगरप्रमुखपद तनवाणी यांना देण्याचे निश्चित झाले आहे, तसेच सोबत येणाऱ्या १० ते १२ समर्थकांना उमेदवारी देण्यावर धोरणानुसार निर्णय होणार आहे. मातोश्रीवर आ. अंबादास दानवे, आ. संजय शिरसाट, गजानन बारवाल, मिलिंद नार्वेकर यांची उपस्थिती होती. दरम्यान, तनवाणी पुढच्या आठवड्यात मेळावा घेऊन भाजपला मोठे खिंडार पाडणार आहेत. यामध्ये दोन विद्यमान नगरसेवक, माजी नगरसेवक व अन्य काही जण शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
भाजपची डिनर डिप्लोमसी फसलीभाजपचे विजय पुराणिक यांच्यासह सर्व नेत्यांनी मंगळवारी दुपारचे जेवण तनवाणी यांच्याकडे घेतले. त्या डिनर डिप्लोमसीत गप्पाच रंगल्या; परंतु तनवाणी यांच्या पुनर्वसनाबाबत काही चर्चा न झाल्याने ती डिनर डिप्लोमसी फसली. निवडणुकीच्या तोंडावर तनवाणी भाजपला ब्लॅकमेल करीत असल्याची चर्चा पक्षाच्या गोटात सुरू झाली. दरम्यान, पुराणिक व भाजपचे पदाधिकारी तनवाणी यांच्या घरून बाहेर पडताच पालकमंत्री देसाई यांनी तनवाणी यांना बुधवारी मातोश्रीवर येण्याचे निमंत्रण दिले. त्यावरून तनवाणी यांनी बुधवारी मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश केला.