भाजपचे शासन सुशासन असून शेतकरी हिताचे निर्णय घेणारे ; चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2017 02:14 PM2017-12-26T14:14:57+5:302017-12-26T14:49:25+5:30
भाजपचे शासन हे सुशासन सरकार असून, नेहमीच शेतकर्यांच्या हिताचे रक्षण करणारे आहे. सरकार महाराष्ट्रातील शेवटच्या शेतकर्याला कर्जमुक्ती देणार असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
करमाड ( औरंगाबाद ) : भाजपचे शासन हे सुशासन सरकार असून, नेहमीच शेतकर्यांच्या हिताचे रक्षण करणारे आहे. सरकार महाराष्ट्रातील शेवटच्या शेतकर्याला कर्जमुक्ती देणार असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने सोमवारी ‘सुशासन युवा महोत्सव’ मेळावा फुलंब्री मतदारसंघातील करमाड येथे आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे तर प्रमुख अतिथी म्हणून विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आ. राहुल टिळेकर उपस्थित होते.
कार्यक्रमास प्रथम भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा उपमहापौर विजय औताडे, औरंगाबाद तालुकाध्यक्ष श्रीराम शेळके, फुलंब्री तालुकाध्यक्ष गोविंद वाघ, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सुदाम गायकवाड, सुदाम ठोंबरे व करमाड ग्रामपंचायतीच्या वतीने उपसरपंच दत्तात्रय उकर्डे व सदस्यांनी चंद्रकांत पाटील व प्रमुख पाहुण्यांचे पुष्पहार देऊन स्वागत केले.
सरकारकडून शेतकरी हिताचे निर्णय
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून युवा महोत्सव व युवा मेळाव्याचे उद्घाटन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते म्हणाले की, केंद्र व राज्य सरकारने गेल्या तीन वर्षांत शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेतले. त्यानुसार महाराष्ट्रातील १ लाख ६७ हजार शेतकर्यांचे दीड लाखांपर्यंतचे ३४ हजार २०० कोटी रुपये कर्ज माफ झाले. ही सर्व रक्कम लवकरच शेतकर्यांच्या खात्यावर जमा होईल. याबाबत शेतकर्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खोट्या प्रचाराला बळी पडू नये, असे आवाहन केले. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सरकारने केलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेऊन काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या ध्येयधोरणांचा समाचार घेतला.
यावेळी भाजपचे राज्य उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, आ. नारायण कुचे, आ. अतुल सावे, नामदेवराव गाडेकर, जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, फुलंब्रीचे नगराध्यक्ष सुहास शिरसाठ, लक्षण औटी, सजनराव मते, राहुल चौधरी, रघुनाथ काळे, साहेबराव डिघुले, दामूअण्णा नवपुते, अशोक पवार, माजी महापौर भगवान घडामोडे, शिवाजी पाथ्रीकर, गणेश पाटील दहीहंडे, प्रकाश चांगुलपाये, अनुराधा चव्हाण, सभापती राधाकिसन पठाडे, अप्पासाहेब शेळके, गोपीनाथ वाघ यांच्यासह फुलंब्री व औरंगाबाद तालुक्यातील भाजपचे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य उपस्थित होते. यावेळी काँग्रेस, शिवसेना कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सूत्रसंचालन भाऊराव मुळे यांनी केले तर आभार उपसरपंच दत्तात्रय उकर्डे यांनी मानले.