- विकास राऊत
औरंगाबाद : भाजपची महाजनादेश यात्रा मराठवाड्यातील ३२ मतदारसंघांतून जाणार आहे. १८ ते २४ आॅगस्टदरम्यान ही यात्रा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात जाणार आहे. विभागातील १६ आमदार भाजपचे आहेत, तर शिवसेनेचे १५. एकूण ४८ मतदारसंघांपैकी ३२ मतदारसंघ यात्रेच्या माध्यमातून ढवळून काढल्यानंतर जो जनादेश भाजपच्या पदरी पडेल त्यावर शिवसेनेसोबत युती करायची, की स्वतंत्र लढायचे, याबाबत पक्षांतर्गत चिंतन होण्याची शक्यता आहे.
१८ आॅगस्ट रोजी आष्टी मतदारसंघातून यात्रेचा मराठवाड्यात प्रवेश होईल. १९ रोजी बीड, गेवराई तेथून पुढे अंबड व बदनापूर या भागातून औरंगाबाद पूर्व मतदारसंघात सभा होईल. २० आॅगस्ट रोजी फुलंब्री, सिल्लोड, भोकरदन, जालना, तर २१ आॅगस्ट रोजी मंठा, सेलू, पाथरी, मानवत, परभणी या मतदारसंघांत महाजनादेशद्वारे भाजपची हवा करण्यात येईल. २२ रोजी औंढा नागनाथ, हिंगोली, कळमनुरी, अर्धापूर, नांदेड, तर २३ आॅगस्ट रोजी लोहा, अहमदपूर, उदगीर, लातूर आणि २४ आॅगस्ट रोजी निलंगा, औसा, उस्मानाबाद व तुळजापूरमार्गे सोलापूर जिल्ह्याकडे ही यात्रा रवाना होईल.
चार दिवसांत मुख्यमंत्र्यांच्या व्यापक मतदारसंघातील नेटवर्क समोर ठेवून सभा घेण्यात येतील. या सभांमधून स्वबळाची चाचपणी करण्यात येईल, असे भाजपच्या गोटातून सांगण्यात येत आहे. विभागातील मंत्र्यांवर, संघटना पदाधिकाऱ्यांवर स्वागत व नियोजनाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे, तर प्रवक्ते शिरीष बोराळकर यांच्यावर सभांच्या नियोजनाची जबाबदारी देण्यात आली आहे. यात्रेमध्ये मुख्यमंत्री आणि त्यांच्या सोबत ५५ जणांची टीम असेल. विभागाची टेहळणी करून त्याचा अहवाल यात्रेच्या नियोजनकर्त्यांकडे पाठविण्यात आला आहे.
शिवसेनेचे मतदारसंघ वगळून यात्राशिवसेनेचे आमदार असलेले मतदारसंघ वगळून भाजपची यात्रा विभागातून जाणार असली तरी ३२ मतदारसंघ भाजप पिंजून काढणार आहे. विद्यमान १६ आमदारांच्या मतदारसंघापुरती ही यात्रा मर्यादित न ठेवता दुप्पट म्हणजे ३२ मतदारसंघ भाजप जवळून पाहणार आहे. शिवसेनेसोबत युती करण्याची योजना पक्षाच्या मनात असेल तर समान जागावाटप होईल, अन्यथा ३२ मतदारसंघांवर भाजप दावा करील. शिवसेनेला त्यांच्या विद्यमान १६ जागांवर समाधान मानण्याची वेळ येऊ शकते.