औरंगाबाद : जिल्हा परिषदेत सर्वात मोठा पक्ष असूनही भाजपला मागील तीन वर्षांपासून सत्तेबाहेर राहावे लागले आहे. याचा वचपा काढण्याची तयारी भाजपच्या वरिष्ठ पातळीवर सुरू आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्षांच्या ८ सदस्यांना आपल्या बाजूला वळविण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. यात काँग्रेसचा एक मोठा गट गळाला लावण्यासाठी बोलणी सुरू आहे. यात यश मिळते का, हे ३ जानेवारी रोजी होणाऱ्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीतच समजणार आहे.
जि.प.च्या पावणेतीन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत भाजपचे २३ सदस्य निवडून आले होते. दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना १८, काँग्रेस १६, राष्ट्रवादी काँग्रेस ३, मनसे १ आणि रिपाइं (डी)१ सदस्य आहेत. भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी शिवसेने काँग्रेसशी हातमिळवणी केली होती. त्यावेळी पहिली अडीच वर्षे अध्यक्षपद शिवसेनेला आणि उर्वरित अडीच वर्षे काँग्रेसला देण्याचा ठराव झाल्याचा दावा काँग्रेसकडून केला जात आहे. त्यावेळी काँग्रेसचे आमदार असलेले अब्दुल सत्तार हे आता शिवसेनेत आहेत. त्यांच्यासोबत काँग्रेसचे ६ सदस्य असल्याचे समोर येत आहे. या सदस्यांमुळे शिवसेनेचे संख्याबळ वाढले आहे. याचवेळी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील समीकरणे बदलली आहेत.
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आली आहे. त्यामुळे काँग्रेसने दिलेला शब्द पाळण्याचे आवाहन शिवसेनेला केले आहे. मात्र, शिवसेना अध्यक्षपदावरील दावा सोडण्याची शक्यता कमी आहे. दोन्ही पक्षांतील बेबनावाचा फायदा उचण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. भाजपच्या एका जबाबदार सदस्याने सांगितले की, भाजपकडे स्वत:चे २३ सदस्य आहेत. सत्तास्थापनेसाठी ८ सदस्यांची गरज आहे. मनसे, रिपाइं (डेमोक्रॅटिक) प्रत्येकी १ आणि राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांचे मन वळविण्यात यश आल्याचे सांगितले. तसेच उर्वरित चार सदस्यांसाठी काँग्रेसमधील तिसऱ्या इच्छुक गटातील चार सदस्य फोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जि.प.मध्ये भाजपची सत्ता आणण्याची जिम्मेदारी ही माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, गंगापूरचे आ. प्रशांत बंब आणि प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड यांच्यावर सोपविली आहे. याशिवाय शिवसेनेच्या १७ सदस्यांपैकी असंतुष्ट दोन सदस्यांवरही भाजपची नजर असल्याचे समजते. भाजपच्या या प्रयत्नांना किती यश मिळते, हे ३ जानेवारी रोजीच स्पष्ट होणार आहे.
मतदानातून दाखवून देऊजि.प.च्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची सत्ता येईल. कोणी इतरही पक्ष प्रयत्न करीत असतील तर त्यांना तो अधिकार आहे. महाविकास आघाडीचा एकही सदस्य फुटणार नाही. शिवसेनेच्या सदस्यांना फोडण्याचा तर प्रयत्नही कोणी करू नये, प्रयत्न केल्यास शिवसेना स्टाईलने उत्तर मिळेल. अध्यक्ष कोणाचा होणार, हे मतदानातून दाखवून देऊ, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आ. अंबादास दानवे यांनी दिली. भाजपचे प्रवक्ते शिरीष बोराळकर म्हणाले, भाजप वेट अॅण्ड वॉचच्या भूमिकेत आहे. काय होणार, हे आम्ही आताच सांगणार नाहीत. मात्र, नक्कीच काही तरी होणार आहे.