औरंगाबाद : राज्यात अडचणीत सापडलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला प्रतिलिटर ३० रुपये भाव देण्यात यावा, दूध भुकटीला प्रतिकिलो ५० रुपये अनुदान देण्यात यावे, यासह इतर मागण्यांसाठी शहर भाजपच्या वतीने शनिवारी दूध डेअरी परिसरात महाएल्गार आंदोलन करण्यात आले. या आंदोलनावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली.
राज्यात दूध दरवाढीसाठी भाजपच्या वतीने महाएल्गार आंदोलन शनिवारी केले. औरंगाबाद शहरातील दूध डेअरी परिसरात शहराध्यक्ष संजय केणेकर यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन पार पडले. यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दुधाला सरसकट प्रतिलिटर १० रुपये अनुदान मिळालेच पाहिजे, दुधाचा भाव आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा अशा विविध घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला होता. यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीचे प्रमुख या नात्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालण्यात आला. यासाठी पवार यांची प्रतिकृती तयार करण्यात आली होती. त्यावर सर्वांनी मिळून दूध टाकले, तसेच महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.
यावेळी शहराध्यक्ष संजय केणेकर म्हणाले, महाविकास आघाडी सरकार कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात अपयशी ठरलेले असतानाच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या दुधाला दरवाढ देत नाही. याचा निषेध नोंदविण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी आमदार अतुल सावे, बसवराज मंगरुळे, मनोज पांगारकर, समीर राजूरकर, सविता कुलकर्णी, माधुरी अदवंत, जालिंदर शेंडगे, शिवाजी दांडगे, कचरू घोडके, गोविंद केंद्रे, डॉ. राम बुधवंत, राजेश मेहता, राजू गायकवाड, हेमंत खेडकर आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणीही भाजपच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले.
सोशल डिस्टन्सचा बोजवारा उडालादूध दरवाढीसाठी भाजपच्या वतीने करण्यात आलेल्या दूध डेअरीसमोरील आंदोलनात सोशल डिस्टन्स पाळण्यात आला नसल्याचे दिसून आले. अनेकांनी तोंडाला मास्क लावलेले नव्हते. काहींनी मास्क काढून शरद पवारांच्या प्रतिमेका दुग्धाभिषेक केला.