सिल्लोड (औरंगाबाद): नगर परिषदेने प्रस्तावित केलेली करवाढ जुलमी व बेकायदेशीर असल्याचा आरोप करत भाजपातर्फे आज सिल्लोड शहर बंद पुकारण्यात आला. बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळपासून दुपारी १२ वाजेपर्यंत व्यापाऱ्यांनी बंदमध्ये सहभाग घेऊन संताप व्यक्त केला. दरम्यान, शिंदे गटाचे आमदार कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात भाजपाने केलेल्या या आंदोलनाची चर्चा आहे.
सराफा बाजार, संत नरहरी चौकापासून भाजप कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन घोषणाबाजी करत शहरात फेरी मारली. शहरातील प्रियदर्शनी चौक, महावीर चौक भगतसिंग चौक अण्णाभाऊसाठे चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक अशाप्रकारे मुख्य रस्त्यावर भाजप पदाधिकाऱ्यानी फिरून व्यापाऱ्यांना बंद करण्यास प्रोत्साहित केले. भाजपातर्फे २६ जानेवारी रोजी उपविभागीय अधिकारी तथा करवाढ समितीचे अध्यक्ष यांना करवाढ कमी करण्याबाबत निवेदन देण्यात आले होते. ६ फेब्रुवारी रोजी भाजपतर्फे सिल्लोड शहरात ढोल बजाव आंदोलन देखील करण्यात आले होते. आंदोलनानंतर सुद्धा प्रशासनाला जाग आली नाही म्हणून सोमवारी हा बंद पुकारण्यात आला होता.
शासन निर्णयानुसार व योग्य पध्दतीने आकारण्यात आलेला कर भरण्यास विरोध नाही. परंतु, चुकीची मालमत्ता कर आकारणी करून कराच्या माध्यमातून जमा करण्यात येत असलेल्या खंडणीचा विरोध करण्यासाठी सिल्लोड बंदचे आवाहन करण्यात आले होते, असे भाजप शहराध्यक्ष कमलेश कटारिया यांनी सांगितले. आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार सांडू पाटील लोखंडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रभाकर पालोदकर, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुरेश बनकर, प्रदेश चिटणीस इंद्रिस मुलतानी, तालुकाध्यक्ष न्यानेश्वर मोठे, किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस मकरंद कोरडे, शहराध्यक्ष कमलेश कटारिया, युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील मिरकर, जि. प. सदस्य अशोक गरुड, उपजिल्हाध्यक्ष विलास पाटील, नगरसेवक मनोज मोरेलू, अड.अशोक तायडे, विष्णू काटकर, व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद मंडलेच्या, शहराध्यक्ष प्रशांत चिनके यांनी केले. यावेळी शहर सरचिटणीस मधुकर राऊत, दादाराव आळणे, प्रकाश भोजवानी, मधुकर जाधव, शामराव आळणे, संजय जाधव, मयूर कुलकर्णी,अतुल साळवे, संतोष ठाकूर, अमोल कुलकर्णी, गणेश भूमकर हजर होते.