छत्रपती संभाजीनगर: आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मंगळवारी (२४ सप्टेंबर) शहर दौऱ्यावर येत आहे. मराठवाड्यातील पदाधिकाऱयांची बैठक घेत ते विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आगामी विधानसभा निवडणूकीसाठी सर्वच राजकीय पक्ष जोमाने तयारीला लागले आहेत. नियोजनासाठी भाजपचेही बैठकासत्र सुरु आहे. छत्तीसगड येथील भाजपचे काही नेतेमंडळ देखील नुकतेच जिल्ह्यात येऊन गेले. आता पुढील नियोजनासाठी म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मंगळवारी सायंकाळी शहरात दाखल होणार आहे. मराठवाड्यातील प्रमुख पदाधिकारी यांची बैठक घेत ते विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहे. एमजीएम परिसरातील रुख्मिणी सभागृहात सायंकाळी पाच वाजता बैठकीस सुरुवात होईल, अशी माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली.
या बैठकीस केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मराठवाड्यातील नेतेमंडळी, प्रमुख पदाधिकारी आदी उपस्थितीत असतील. दरम्यान, लोकसभा निवडणूकीत मराठवाड्यात भाजपला यश मिळाले नाही. त्यामुळे आता विधानसभेत भाजप काय रणनिती आखणार पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
असा आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दोन दिवसीय जिल्हा दौरा - मंगळवार दि.२४ रोजी सायं. सव्वा सहा वा. छत्रपती संभाजीनगर विमानतळ येथे आगमन व एमजीएम कॅम्पस कडे प्रयाण, सायं.साडेसहा वा. रुक्मिणी हॉल, सिडको एन ६, एमजीएम कॅम्पस येथे आगमन व बैठकीसाठी राखीव, ऱात्री ८ वा. ३५ मि. नी.मोटारीने हॉटेल रामा इंटरनॅशनल कडे प्रयाण, रात्री.८ वा. ४० मि. नी हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे आगमन, रात्री सव्वा नऊ वा. बैठकीसाठी राखीव. नंतर मुक्काम.- बुधवार दि.२५ रोजी सकाळी ११ वा. हॉटेल रामा इंटरनॅशनल येथून मोटारीने छत्रपती संभाजीनगर विमानतळाकडे प्रयाण, सकाळी ११ वा. १० मि. नी. छत्रपती संभाजीनगर विमानतळ येथे आगमन व सकाळी ११ वा. १५ मि. नी विमानाने नाशिककडे प्रयाण.