लोकमत न्यूज नेटवर्कवैजापूर : वैजापूर नगर परिषदेची निवडणूक आता नव्या वर्षातच होणार असून ही न.प. ताब्यात घेण्यासाठी भाजपतर्फे मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. एक वर्षांपासून शिवसेनेसोबत घरोबा करणारे तथा नगराध्यक्षपदाचे प्रबळ उमेदवार मानले जाणारे डॉ. राजीव डोंगरे यांनी दिवाळीच्या दोन दिवस आधी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत अनपेक्षितपणे भाजपमधे प्रवेश करुन शहरातील राजकीय वर्तुळात ‘बंब’ टाकला आहे. त्यामुळे आता भाजपतर्फे डॉ. डोंगरे नगराध्यक्षपदाचे उमेदवार जवळपास निश्चित झाल्याची चर्चा शहरात सुरु आहे.राज्यात शिवसेनेबरोबर आगामी निवडणुकांत युती झाली नाही तर भाजपतर्फे स्वबळाची तयारी सुरू झाली आहे. शिवसेनेबरोबर २०१८ मध्ये होणा-या नगर परिषद निवडणुकीत युती होणारच नाही, असे गृहीत धरून कामाला लागण्याचे निर्देश गेल्या आठवड्यात झालेल्या भाजपच्या आढावा बैठकीत गंगापूरचे आमदार प्रशांत बंब व जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांच्याकडून मिळाल्याने या हालचाली सुरू झाल्या आहेत. वैजापूर नगर परिषदेवर सुरुवातीपासून काँग्रेस व शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे. आमदार होण्यापूर्वी या नगर परिषदेवर आर. एम. वाणी यांचे वर्चस्व होते. हा अपवाद वगळता सातत्याने काँग्रेसकडून डॉ. दिनेश परदेशी यांनी नगर परिषदेवर आपली पकड ठेवलेली आहे.यापूर्वी झालेल्या थेट नगराध्यक्षाच्या निवडणुकीत काँग्रेसतर्फे डॉ. दिनेश परदेशी निवडून आलेले आहेत. काँग्रेसचे शहरात संघटन चांगले असून प्रत्येक प्रभागात शाखा विस्तारही मोठा आहे. या पार्श्वभूमीवर भाजपला वैजापूर नगरपरिषद निवडणुकीत आव्हानात्मक राहण्याची चिन्हे आहेत.भाजपतर्फे डॉ. डोंगरे यांच्याबरोबर काँग्रेसमधील दोन दिग्गज नेत्यांच्या नावांबाबत सुद्धा भाजपकडून चाचपणी सुरू आहे. त्यामध्ये बाळासाहेब संचेती यांचे नाव आघाडीवर आहे.संचेती हे काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष आहेत. सहा महिन्याच्या कार्यकाळात शहराचे सुशोभिकरण करण्यात त्यांचा मोठा सहभाग राहिलेला आहे. या तिघांपैकी कोणीही अद्याप नगराध्यक्षसाठी उमेदवारी मिळावी म्हणून पक्षाकडे प्रयत्न केलेले नाहीत. मात्र पक्षातर्फे हे तिघे प्रबळ आणि शिवसेनेला टक्कर देऊ शकणारे उमेदवार मानले जात आहेत.
नगराध्यक्षपदासाठी भाजपची मोर्चेबांधणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 1:12 AM