गंगापूर (औरंगाबाद): मराठवाड्यात परतीच्या पावसाने प्रचंड नुकसान झाले असून यामध्ये गंगापूर तालुक्यातील पिकांना देखील फटका बसला आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. संपूर्ण तालुक्यात शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे. शासन मात्र मदतीबाबत कोणतेच पाऊले उचलीत नसल्याने तालुक्यातील वाहेगाव येथील शेतकऱ्यांनी स्मशानात दिवाळी साजरी करून सरकारचा निषेध केला.
अतिवृष्टी व परतीच्या पावसाने तालुक्यातील खरिपाचे पीक शेतकऱ्यांच्या हातून गेले आहे. कापूस, तुर, मका, सोयाबीन आदी पिकांचा चिखल झाला आहे. यासाठी सरकारने जाहीर केलेली मदत तोकडी असून पंचनामे झालेले नसल्याने सदरील मदत दिवाळी पूर्वी मिळू शकली नाही. यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात असून खर्चाला पैसे नसल्याने वर्षातील सर्वात मोठा सण साजरा करता येत नाही, अशी अशी खंत व्यक्त करत वाहेगाव येथील शेतकऱ्यांनी आज सकाळी गावच्या स्मशानभूमीत काळी दिवाळी साजरी केली.
यावेळी शेतकऱ्यांनी अतिवृष्टीने सडलेला कांदा, कापूस, मका स्मशानभूमीत आणून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजार रुपये नुकसाभरपाई, सरसकट आर्थिक मदत द्यावी, अशा मागण्या शेतकऱ्यांनी केल्या. या अनोख्या आंदोलनात अनंता भडके, नवनाथ मनाळ, शरद हिवाळे, लक्ष्मण गोरे, धनंजय चाफेकर, गोरखनाथ शिरसाट, नारायण मनाळ, ऋषिकेश मनाळ, राहुल पारखे, प्रकाश मनाळ, कल्याण मनाळ, ज्ञानेश्वर हिवाळे, पांडुरंग मनाळ, प्रल्हाद भडके,प्रभाकर हिवाळे, आनंद मनाळ, अमोल मनाळ, विठ्ठल शिंदे, राहुल कारभार आदी शेतकऱ्यांचा सहभाग होता.