छत्रपती संभाजीनगर : दिवसाचे तापमान पार ३९ अंश सेल्सिअसपर्यंत, नंतर ढगाळ वातावरणाने थोडा मिळतोय दिलासा, तर रात्री पुन्हा गरम वाफा... त्यात आता पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उन्हाळा की पावसाळा हेच आता कळेनासे झाले आहे. दुपारपर्यंत कडक ऊन असल्याने एकीकडे इलेक्ट्रॉनिक्स शोरूममध्ये फ्रीजची मागणी वाढली आहे तसेच गरिबांचा फ्रीज म्हटल्या जाणाऱ्या ‘माठा’ची विक्रीही वाढली आहे.
बाजारात काळा माठ, लाल माठ, चिनी मातीचा माठ, नळतोटीसह माठ, नक्षीदार माठ असे विविध प्रकार दाखल झाले आहेत. मात्र, यामुळे ग्राहक संभ्रमित झाले आहेत. कारण, कोणता माठ खरेदी करावा, कोणत्या माठातील पाणी सर्वाधिक थंड होते, असा प्रश्न एकामेकांना विचारून मगच माठ खरेदी केला जात आहे.
कोणत्या माठातील पाणी झाले जास्त थंड?१) काळ्या खापराचा माठ : पिढ्यान्पिढ्यांपासून काळ्या खापराचा माठातील पाणी पिण्याची परंपरा आहे. कारण, काळ्या माठातील पाणी सर्वाधिक थंड व गोड होते. या माठाला सच्छिद्र असल्याने थंड हवा लागून पाणी गार होते. आपल्याकडे ३९ अंश सेल्सिअस तापमान असतानाही या माठात अवघ्या साडेतीन तासात पाणी ३० अंश सेल्सिअस इतके गार झाल्याचे दिसून आले.२) लाल माठ : अलीकडच्या १० ते १५ वर्षात लाल माठाची आवक शहरात वाढली आहे. मात्र, या माठात पाणी गार होते का असा प्रश्नही ग्राहक विक्रेत्यांना विचारत असतात. आम्ही केलेल्या प्रयोगात रविवारी ३९ अंश सेल्सियस तापमानात चार तासात या लाल माठातील पाणी २३ अंश सेल्सिअस इतके गार झाले.३) चिनी मातीचा माठ : गेल्या काही वर्षांपासून बाजारात रस्तोरस्ती आकर्षक रंगाचे चिनी मातीचे माठ विक्रीला येत आहे. पांढरा रंग व त्यावर केलेली डिझाइन ग्राहकांना आकर्षित करते. ३९ अंश सेल्सिअस तापमानाला १५ अंश सेल्सिअस पाणी गार होत असल्याचे आढळून आले.
माठातले पाणी थंड कसे होते?मातीचा माठात पाणी गार होते. त्याचे कारण म्हणजे त्यास असलेले सच्छिद्र. पाणी माठात टाकल्यावर ते सच्छिद्रांद्वारे बाहेर झिरपते. त्यावेळी बाष्पीभवन होत असताना त्यातून बाहेर पडणाऱ्या सुप्त उष्णतेमुळे पाणी थंड होते. मात्र, माठ जास्त गळणेही चांगले नाही. काही जण माठ झिरपू नये म्हणून सिमेंट लावतात त्यामुळे सच्छिद्र बंद होऊन पाणी गरम होत नाही.- दिलीप मुंढे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक
कोणता माठ किती रुपयांना१) काळ्या खापराचा माठ : आकारानुसार २०० ते ४०० रुपयांपर्यंत माठ२) लाल माठ : आकारानुसार २०० ते ४०० रुपयांपर्यंत३) चिनी माठ : २५० ते ५०० रुपयांदरम्यान