लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांना ब्लॅकमेल करून स्थानिक कार्यकर्ते आपल्याला हवे तसे निर्णय घेत असल्याचा आरोप उत्कर्ष पॅनलचे निमंत्रक डॉ. शिवाजी मदन यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत केला.डॉ. मदन यांनी आरोप केला की, विद्यापीठ कार्यालयीन कामकाजाच्या वेळांमध्ये चालत नाही, तर सुटीच्या दिवशी किंवा रात्रीच्या अंधारात चालते. मागील चार वर्षांत पैशांची उधळपट्टी, नियमबाह्य कामे, अधिकार मंडळांवर नामनिर्देशन करताना पक्षपात करणे आदींसह कुलगुरूंनी आर्थिक लूट चालविली आहे. त्यामुळे चौकशी होईपर्यंत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात यावे. कुलगुरूंनी विविध जर्नल, ग्रंथांमध्ये स्वत:चे लेख प्रसिद्घ करून घेण्यासाठी विद्यापीठ फंडातून ७ लाख ९२ हजार रुपये खर्च केले. क्रीडा विभागातील व्यायामशाळेतील साहित्य कुलगुरूंनी स्वत:साठी बंगल्यात बसविले आहे. अभ्यास मंडळावर सदस्यांचे नामनिर्देशन करताना कुलगुरूंनी बोगस पद्धतीने भाजप विचारधारेचे पदाधिकारी घुसविले आहेत. यासंदर्भात काहींनी राज्यपालांकडे तक्रार केली आहे. हा निर्णय येईपर्यंत विद्यापरिषदेतून दोन सदस्यांना व्यवस्थापन परिषदेत निवडून पाठविण्याचे कामदेखील रखडले आहे. व्यवस्थापन परिषद निवडणूक डोळ्यासमोर ठेवून डॉ. साधना पांडे यांनी आंतरविद्याशाखेचा राजीनामा दिला. याच राजीनामापत्रावर डॉ. संजीवनी मुळे यांची अधिष्ठाता म्हणून नियुक्ती केली. नवोपक्रम मंडळाच्या संचालकपदी डॉ. महेंद्र शिरसाट यांची निवड करून दोघांनाही २५ मे रोजीच नियुक्तीपत्र देऊन मतदार यादीत नाव समाविष्ट केले.पत्रकार परिषदेला प्रा. सुनील मगरे, डॉ. फुलचंद सलामपुरे, डॉ. राहुल म्हस्के, डॉ. नरेंद्र काळे, डॉ. राजेश करपे, डॉ. लक्ष्मीकांत शिंदे, डॉ. भारत खैरनार, डॉ. भारत खंदारे, डॉ. विलास खंदारे, प्रा. रमेश भुतेकर, डॉ. संभाजी वाघमारे, डॉ. मोहंमद बारी आदींची उपस्थिती होती.
कुलगुरूंना केले जातेय ब्लॅकमेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2018 1:15 AM