लोकमत न्यूज नेटवर्कबीड : चांगले मार्क मिळवायचे असतील किंवा प्रॅक्टीकलमध्ये उत्तीर्ण व्हायचे असेल तर मी म्हणेल तसे करा, नाहीतर परिणामास सामोरे जा, असा सज्जड दम विठाई नर्सिंग महाविद्यालयाचा प्राचार्य राणा डोईफोडे देतो. त्याच्यावर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी १२ विद्यार्थिनी बीड ग्रामीण ठाण्यात रात्री आठ वाजेपर्यंत ठाण मांडून होत्या. प्राचार्याच्या ‘ब्लॅकमेलिंग’ने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.बीडपासून अवघ्या पाच किमी अंतरावर जालना रोडवर विठाई हॉस्पिटल आहे. येथेच नर्सिंग महाविद्यालय असून बाजूलाच विद्यार्थिनींना राहण्यासाठीचे वसतिगृह आहे. या महाविद्यालयात भाजपच्या पाली जि.प. गटाच्या सदस्या सारिका डोईफोडे यांचे पती राणा डोईफोडे हे प्राचार्य आहेत. २००४ साली डोईफोडे हे महाविद्यालयात प्राचार्य म्हणून रुजू झाले होते. या महाविद्यालयात शंभरच्या जवळपास विद्यार्थिनी वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. परंतु मागील काही दिवसांपासून महाविद्यालयातील वातावरण वेगळ्याच कारणाने चर्चिले जात होते. महाविद्यालयातील विद्यार्थिनींशी प्राचार्य अश्लील वर्तन करण्याबरोबरच त्यांना उद्धट वागणूक देत असल्याच्या तक्रारी विद्यार्थिनींकडून वाढल्या होत्या. या तक्रारींचा पाढा विद्यार्थिनींनी महाविद्यालय प्रशासनापुढे वाचला होता. परंतु प्रशासनाने डोईफोडे यांना पाठीशी घालत आम्हालाच दम दिला, असा आरोप ठाण्यात आलेल्या विद्यार्थिनींनी केला.महाविद्यालयात चांगल्या गुणाने पास व्हायचे असेल तर तर माझ्या म्हणण्याप्रमाणे वागा, असे डोईफोडे आम्हाला धमकावत असल्याचेही या विद्यार्थिनींनी सांगितले. डोईफोडेंबद्दल एकना अनेक तक्रारींचा पाढा या विद्यार्थिनींनी पोलिसांसह जमलेल्या नागरिकांसमोर पत्रकारांना वाचून दाखविला. या घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली असून, विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
राणाचे प्रॅक्टिकलसाठी ‘ब्लॅकमेल’
By admin | Published: May 26, 2017 11:21 PM