विजय मुंडे। लोकमत न्यूज नेटवर्कउस्मानाबाद : युवकांचे हात एकत्रित आले तर परिवर्तन व्हायला वेळ लागत नाही, याची प्रचिती तालुक्यातील बेंबळी गावात येत आहे़ गावातील स्वच्छता ग्रुपचे ३० ते ३५ युवक प्रत्येक रविवारी गावात ‘ग्रामसेवा स्वच्छता अभियान’ राबवित आहेत़ युवकांनी श्रमदानातून आजवर गावातील १३ विभाग स्वच्छ केले आहेत़एखाद्या मोठ्या गावात मोहीम राबविणे म्हणजे मोठे अवघड काम! मात्र, तालुक्यातील बेंबळी येथील युवकांनी अशा असाध्य कामाला साध्य करण्याच्या ध्यास घेतला आहे़ शासनस्तरावरून स्वच्छ भारत अभियानांतर्गत गावे, शहरे पाणंदमुक्त, स्वच्छ करण्यासाठी कोट्यवधी रूपये खर्च करण्यात येत आहेत़ मात्र, कोणत्याही शासकीय मदतीची अथवा नेत्याच्या पुढाकाराची वाट न पाहता गावातील युवकांनी ‘ग्रामसेवा स्वच्छता अभियान’ राबविण्याचा संकल्प केला़ गावातील डॉक्टर, व्यवसायिक, इंजिनिअर, शिक्षक, पत्रकारांसह विविध क्षेत्रात काम करणाऱ्या युवकांनी एकत्रित येऊन १९ फेब्रुवारी रोजीच्या पहिल्या रविवारी स्वच्छता अभियानाला प्रारंभ केला़ स्वच्छतेसाठी लागणारे हँडग्लोज, खोऱ्या, खराटे आदी विविध साहित्य स्वनिधीतूनच उभा केले़ १९ फेब्रुवारी पासून घेतलेला स्वच्छतेचा वसा आजही अखंडितपणे कायम आहे़ पुढील रविवारी कोणती गल्ली, कोणत्या विभागात स्वच्छता मोहीम राबवायची, याचे नियोजन केले जाते़ नियोजित विभागाची माहिती व्हाटस्अॅप व इतर सोशल माध्यमांद्वारे सर्वांना दिली जाते़ रविवारी पहाटे ६ ते सकाळी ८ या वेळेत नियोजित भागात स्वच्छता मोहीम राबवून जमा झालेला कचरा जाळण्यात येत आहे़ युवकांनी सुरू केलेल्या कामामुळे गावातील १३ भाग स्वच्छ झाले आहेत़ गाव स्वच्छ करणे, कॅरिबॅग मुक्त करणे, वृक्षारोपन, सांस्कृतिक क्षेत्राला चालना देणे आदी विविध उद्देश समोर ठेवून हे काम युवकांनी हाती घेतले आहे़ ग्रामसेवा ग्रुपचे चंदन भडंगे, डॉ़ अमोल गावडे, बालाजी शिंदे, चंद्रकांत सांगवे, निलेश मरगणे, धर्मराज गावडे, बबलू गावडे, प्रशांत माने, रवी पाटील, शहानवाज शेख, उमाजी रेडेकर यांच्यासह इतर युवक हा उपक्रमाच्या यशस्वीततेसाठी प्रयत्नशील आहेत़गावातील विश्वनाथ बालाजी शिंदे या ८ वर्षीय बालकाने सर्वच रविवारी या मोहिमेत सहभाग घेऊन गावाला स्वच्छ करण्यासाठी श्रमदान केले आहे़ विशेष म्हणजे, ग्रुपमधील सदस्यांच्या वाढदिवसाला गावात एक नवी कचराकुंडी उभी केली जात आहे़
बेंबळीतील युवकांनी घेतला स्वच्छतेचा वसा !
By admin | Published: May 14, 2017 11:11 PM