औरंगाबाद: रोहिला कॉलनीत एका घरात बसलेल्या ४५ वर्षीय आॅप्टिकल व्यावसायिकावर तलवारीने वार करून त्यांचा निर्घृण खून करण्यात आला. ही घटना रविवारी दुपारी सव्वा चार ते साडेचार वाजेच्या सुमारास घडली. या हत्येचे कारण समजू शकले नाही, मारेकरी पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.सय्यद अकील हुसेन हमीद हुसेन (४५, रा. नुरकॉलनी, बुढीलेन)असे मृताचे नाव आहे. सय्यद अकील यांचे कुटुंब शहरात अनेक वर्षापासून आॅप्टिकल चष्म्याच्या व्यवसायात आहे. सय्यद अकील हे आज दुपारी रोहिला कॉलनीत राहणाा-या सीमा बेगम(नाव बदलले) यांच्या घरी आले होते. तेथे सीमा आणि त्यांच्या मुलीसोबत ते बोलत असताना दोन तरूण अचानक तेथे आले आणि त्यांनी अकील यांच्यावर धारदार तलवारीने हल्ला चढविला.या घटनेत अकील यांच्या पोटावर, छातीवर आणि डोक्यावर वार करण्यात आले. यामुळे अकील यांच्या पोटातील आतडे तुटून बाहेर पडले आणि ते घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात पडले. यानंतर हल्लेखोर तेथून पसार झाले. यावेळी या घटनेची माहिती सीमा यांनी अकील यांच्या नातेवाईक शेख इस्माईल शेख अय्युब (रा. किराडपुरा)यांना कळविली आणि अकील यांना रिक्षातून त्यांनी घाटीत नेले. तेथे ईस्माईलच्या ताब्यात अकील यांना सोपवून त्या दोघी घाटीतून गायब झाल्या.अकील यांना घाटीतील अपघात विभागात दाखल केल्यानंतर सव्वा पाच वाजेच्या सुमारास अपघात विभागातील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या घटनेची माहिती इस्माईल यांनी तातडीने सिटीचौक पोलिसांना दिली. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास सिटीचौक पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक शैलजा जानकर आणि कर्मचा-यांनी घटनास्थळी तर, पोलीस उपनिरीक्षक आर.एम.बांगर यांनी घाटीत धाव घेतली. याविषयी सहायक निरीक्षक जानकर म्हणाल्या की, अकील यांचा खून कोणी आणि का केला,याबाबतची कोणतीही माहिती सध्या उपलब्ध झालेली नाही. अकील हे हकीम म्हणूनही ओळखल्या जात. याप्रकरणी अद्याप पोलिसांना फिर्याद प्राप्त झाली नाही.दोन दिवसांपूर्वी झाला वादसीमा बेगम या दीड ते दोन महिन्यांपासून रोहिला कॉलनीत घर भाड्याने घेऊन राहात. तेथे अकील यांचे येणे-जाणे होत. दोन ते तीन दिवसापूर्वी तेथे दहा ते पंधरा जण आले होते आणि त्यांच्यात वाद झाला होता. त्याा वादाचा आणि आजच्या घटनेचा काही संबंध आहे, का याबाबत पोलीस तपास करीत आहे.
रोहिला कॉलनीत तलवारीच्या हल्ल्यात व्यावसायिकाचा खून
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2017 9:30 PM